केशोरी बाजार परिसरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:12+5:302021-02-05T07:51:12+5:30
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव मोठ्या गावापैकी एक गाव असून, येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरविला ...

केशोरी बाजार परिसरात अस्वच्छता
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव मोठ्या गावापैकी एक गाव असून, येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरविला जातो. येथील आठवडी बाजार भरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असली तरी, बाजारातील व्यवस्थापन एका बाजार ठेकेदारास दिले आहे. या परिसरातील १५ ते २० लहान-लहान खेड्यांमधील लोक वस्तू व भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. साहित्य विक्रीसाठी ग्रामपंचायतकडून तशी व्यवस्था करून दिली असली तरीही कोंबड्यांचे मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून पाहिजे तशी स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे बाजार परिसरात कोंबड्यांची पंख पसरली आहेत. याकडे संबंधित बाजार ठेकेदारांनी लक्ष देऊन बाजार परिसरातील स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.’
कोरोना महामारीच्या भीतीने येथील आठवडी बाजार मार्च २०२० पासून प्रशासनाने बंद ठेवले होते; परंतु अलीकडे कोरोना महामारीचा प्रभाव कमी होताच येथील आठवडी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला दुकान वगळता इतर भागात कोंबड्या व मत्स्य व्यावसायिकांची दुकाने थाटली आहेत. त्या भागात सगळीकडे अस्वच्छता व कोंबड्यांचे पंख पसरलेली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आठवडी बाजार परिसरात जि.प. प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन बँक, वन विभागाची कार्यालये असून, येथील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना पसरत असलेल्या कोंबड्यांच्या पंखामुळे त्रास सोसावा लागत आहे. कोरोना संसर्गाची भीती कायम असतानाच आता नव्याने निर्माण झालेला ‘बर्ड फ्लू’ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन बाजार भरविणाऱ्या कंत्राटदाराला सूचना देऊन बाजार परिसरात स्वच्छता राहील, याची व्यवस्था करण्यास सांगावे. प्रत्येक दुकानदारांकडून कराच्या माध्यमातून वर्षापोटी लाखो रुपये जमा करीत असतो. त्यामधून स्वच्छता ठेवण्यासाठी काही पैसा खर्च करून बाजार परिसरातील पसरलेल्या कोंबड्यांची पंखं उचलून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.