दोन नावे, दोन जन्मतारखा व तीन जन्मस्थळ
By Admin | Updated: April 1, 2016 02:09 IST2016-04-01T02:09:50+5:302016-04-01T02:09:50+5:30
तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील तत्कालीन कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व ...

दोन नावे, दोन जन्मतारखा व तीन जन्मस्थळ
पी.एच. लाडे फसवणूक प्रकरण : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील तत्कालीन कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सध्या नागरा (कटंगी) येथे कार्यरत पी.एच. लाडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तरी जिल्हा परिषदेने इतर प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे दोन नावे कसे व नेमके कोणते, जन्मतारिख कशी बदलली व नेमकी कोणती. तीन जन्मस्थळांपैकी खरे कोणते? याचा खुलासा आजही जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसून सदर शिक्षक बिनधास्तपणे कार्यरत आहे.
जात बदलविण्याच्या गुन्ह्यात न्यायालय न्याय देईलच. परंतु जात बदल करून अभिलेखात खाडाखोड करणे, दोन नावे चालविणे, जन्म तारखेत बदल करणे, जन्म स्थळ वेगवेगळे दर्शविणे तसेच हे सर्व करण्यासाठी स्थानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागतात, ते कसे मिळाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खऱ्या बाबी उजागर करण्यासाठी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याऐवजी जि.प. शिक्षण विभागाने सर्व दडवून ठेवले.
देव्हाडा येथील मुख्याध्यापक प्रकाश वासुदेव साठवणे (ता. मोहाडी, जि. भंडारा) हे शालेय अभिलेखासह समितीसमोर हजर झाले. त्यात १ मे १९६१ ला शाळेत दाखल व जन्मतारिख २३ एप्रिल १९६१ नोंदविलेली आहे. दाखल खारिज रजिष्ट्ररवर नाव प्रेमदास हरिराम लाडे असून जन्मस्थळ नरसिंहटोला आहे. तर चंद्रपूर येथील ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशनचे प्राचार्य यांना समितीसमोर बोलाविण्यात आले होते. त्यांनी समितीला पुरावे सादर केले. त्यानंतर कनिष्ठ लिपिक गणेश रामचंद्र मुखत्याल हे अभिलेख घेवून हजर झाले. त्यात जन्म तारिख २३ एप्रिल १९६५ असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक शाळेत जन्मस्थळ नरसिंहटोला (देव्हाडा), सेवा पुस्तिकेत साकोली येथील पंचशील वार्ड, तर जात प्रमाणपत्र नागपूर येथून बनविताना जन्मस्थळ नागपूर सांगण्यात आले. त्यामुळे प्रेमदास हरिराम लाडे हे नमके कोठे जन्माला आले, हे ठरविणे कठिण आहे. (प्रतिनिधी )