दोन लाखांची लाखोळी तूर भस्मसात
By Admin | Updated: March 18, 2017 01:48 IST2017-03-18T01:48:37+5:302017-03-18T01:48:37+5:30
तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळी तुरीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे

दोन लाखांची लाखोळी तूर भस्मसात
सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळी तुरीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (खडकी) येथील शेतकरी हेतराम हरी पारधी यांच्या मालकीच्या शेतामध्ये लाखोळी तूर व जवस पेरलेली होती. ही लाखोळी ५ एकरामध्ये होती. तसेच आजू-बाजूचे शेतकरी बाबुलाल पटले यांची २ एकरामध्ये, महादेव रहांगडाले ७ एकरामध्ये, सितन भगत यांची २ एकरामध्ये, सागन कटरे यांची ५ एकरमध्ये, राधेशाम कटरे यांची २ एकर मध्ये व श्रावण कटरे यांची १ एकर शेतीमध्ये लाखोळी पेरलेली होती.
या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लाखोळी व जवस काढल्यानंतर हेतराम पारधी यांच्या शेतामध्ये जमा केली.
पारधी यांच्या शेतामध्ये लाखोळी तुरीचे ढीग होते. त्या सर्व शेतकऱ्यांची लाखोळी मिळून २ लाख २० हजार रुपयांच्या त्या लाखोळीच्या ढिगाला अचानक सकाळी ८ वाजतादरम्यान आग लागली. आग इतक्या लवकर पसरली की विझवण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामध्ये शिशुपाल पटले यांचे सागाचे टाल जळले. त्यामुळे अंदाजे २० हजार रुपयांची सागाची लाकडे जळाली.
तलाठी मुंडे यांनी पंचनामा करुन तहसील कार्यालयामध्ये सादर केला. पंचनामा करतेवेळी तलाठी मुंडे, सेवा सहकारी अध्यक्ष शिशुपाल पटले, उपसरपंच डॉ.अनिल कटरे, हेतराम पारधी, राधेशाम कटरे, अरुण पटले, उरकुडा पटले व गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)