बिबट्या शिरला घरात, हाकलून लावण्याच्या प्रयत्नात दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 16:06 IST2021-11-10T16:00:04+5:302021-11-10T16:06:55+5:30
मंगळवारी अचानक स्थानिक रामदास काळे यांच्या घरात बिबट्या दाखल झाला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. यावेळी बिबट्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गावातील दोन युवक जखमी झाले.

बिबट्या शिरला घरात, हाकलून लावण्याच्या प्रयत्नात दोनजण जखमी
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर येथे दिवसाढवळ्या एका घरामध्ये बिबट्याने बस्तान मांडले. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यावर शेजारचे युवक धावून आले. बिबट्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गावातील दोन युवक जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.
अर्जुनी मोरगाव तालुका वनराईने नटलेला आहे. या तालुक्यातील बहुतांश गावशिवाराला जंगल लागून असल्याने नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. तालुक्यातील झाशीनगर येथे महिन्याभरापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. मंगळवारी अचानक स्थानिक रामदास काळे यांच्या घरात बिबट्या दाखल झाला.
हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली, ते पाहून नागरिकही घराभोवती गोळा झाले. यावेळी शेजारच्या दोन युवकांनी बिबट्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. राजकुमार राणू मडावी (वय ३२) आणि गोविंदा मोतीराम प्रधान (३३) अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, जमलेल्या लोकांनी थोड्या वेळात बिबट्याला हुसकावून लावले. मात्र, या प्रकाराने सगळ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.