रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन शेतकरी ठार
By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:29+5:302014-10-11T23:09:29+5:30
रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन शेतकरी ठार
सालेकसा/आमगाव : रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला (झालिया) ता.सालेकसा येथील रहिवासी आहेत.
दरम्यान मृतांच्या कुटूंबीयांना त्वरित मोबदला मिळावा, तसेच एकाला शासकीय नोकरी देण्याची हमी मिळावी म्हणून संतप्त गावकऱ्यांनी साकरीटोला येथे चक्काजाम केला. त्यामुळे आज दिवसभर आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
संतोष झनकलाल सुलाखे (३२) आणि राहूल दिवाकर जांभुळकर (२२) हे दोघे शेतकरी साकरीटोला-आमगावदरम्यान वाहत असलेल्या काष्टासोडी नाल्याचे पाणी आपल्या शेतीला सिंचन करण्यासाठी पंप लावत होते. रात्री ११ वाजताच्यादरम्यान आमगाववरून सालेकसाकडे जात असलेली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला टक्कर दिली त्यामुळे रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती सरळ दोन शेतकऱ्यांचा अंगावर गेली, अशी माहिती चालक कृष्णकुमार राधेश्याम क्षीरसागर याने दिले. त्या रुग्णवाहिकेत डॉ.धीरज बहेकार हे सुध्दा बसले होते. काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेने त्या जखमींना आमगाव येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषीत केले.
दोन शेतकऱ्यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटूंबावर मोठा आघात झाला. गावात एकच शोककळा पसरली, त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मृताच्या कुटूंबीयांना अंत्यसंस्कारापूर्वी किमान पाच लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरीची हमी मिळावी म्हणून गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम थांबवून आमगाव-सालेकसा मार्गावर चक्काजाम केला. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेत डॉक्टर बसले असूनसुध्दा त्यांनी अपघातानंतर जखमीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच नाही तर गाडीवरून उतरण्याची माणूसकी सुध्दा दाखविली नाही, असा आरोप करीत अशा डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी गावातील सर्व महिला-पुरूष रस्त्यावर ठाण मांडून बसून होते. त्यामुळे आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. (प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)