जिल्ह्यात आज बालकांना दोन थेंब जीवनाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:33+5:302021-02-05T07:45:33+5:30
गोंदिया : ३१ जानेवारीला जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटांतील बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरणापासून एकही बालक ...

जिल्ह्यात आज बालकांना दोन थेंब जीवनाचे
गोंदिया : ३१ जानेवारीला जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटांतील बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी पोलिओ लसीकरणाचे सूक्ष्म करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटांतील १ लाख ९ हजार ८५६ लाभार्थ्यांना पोलिओ डोज दिला जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ९२,६६१ तर शहरी भागातील १७,१९५ बालकांचा समावेश आहे.
यासाठी १ लाख ३९ हजार आवश्यक पोलिओ लस उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण-१,२८९ तर शहरी-११९ अशा एकूण १,४०८ लसीकरण बुथवर पोलिओचे डोज दिले जाणार आहे. या मोहिमेमध्ये बायव्हायलंट लसीचा वापर करण्यात येणार आहे. मोहिमेच्या दिवशी बुथवर व त्यानंतर, सुटलेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस, याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, टोल नाके, विमानतळ येथे लाभार्थ्यांचे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांझिट टीमचे गठन करण्यात आले आहे.
......
अशी चालेल मोहीम
० ते ५ वयोगटांतील लाभार्थी : १ लाख ९ हजार ८५६
पल्स पोलिओ डोज प्राप्त : १ लाख ३९ हजार
एकूण बुथ : १,४०८
आरोग्यसेवक : ३,१६९
पर्यवेक्षक : २७६
आरोग्य संस्था : ३०१
मोबाईल पथक : ८२
ट्रांझिट पथक : २५
वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
.......
बॉक्स
शहरी व ग्रामीण भागात राहणार पथके
३१ जानेवारीला जिल्ह्यातील एकूण १,४०८ बुथवरून ० ते ५ या वयोगटांतील बालकांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. यासाठी १ लाख ३९ हजार बायव्हालंट या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात लसीकरण केंद्र राहणार असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन ० ते ५ वयोगटांतील बालकांना पोलिओचा डोज देणार आहे.
.....
८२ ट्रांझिट पथके
पाेलिओ डोज घेण्यापासून ० ते ५ वयोगटांतील एकही बालक वंचित राहू नये, यासाठी रेल्वे व बस स्थानकावरही पोलिओ डोज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ८२ मोबाइल व ट्रांझिट पथकाचे गठन करण्यात आले आहे, तसेच या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
.......
कोट
पल्स अभियानांतर्गत रविवारी जिल्ह्यातील एकूण १,४०८ बुथवरून १ लाख ९ हजार ८५६ बालकांना पोलिओचा डोज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पथकेही तयार करण्यात आली आहे. एकही बालक पोलिओचा डोज घेण्यापासून वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ.नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी