गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे पावने दोन कोटीची रोकड जप्त; निवडणूक पथकाची कारवाई
By अंकुश गुंडावार | Updated: March 27, 2024 18:20 IST2024-03-27T18:20:36+5:302024-03-27T18:20:50+5:30
कारमध्ये वाहून नेत होते रक्कम

गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे पावने दोन कोटीची रोकड जप्त; निवडणूक पथकाची कारवाई
गोरेगाव (गोंदिया) : निवडणूक विभागाच्या एफएसटी व एसएसटी पथकाने गोरेगाव तालुक्यातील सोनी नाक्याजवळ एका कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रोख जप्त केली. ही कारवाई बुधवारी (दि.२७) दुपारी २ वाजताच्या सुमारास केली. लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना आमीष देण्यासाठी रोख रक्कमेचा वापर केला जातो. त्यामुळे प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाके उभारुन भरारी पथकाची नेमणूक केली आहे.
बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदिया-ठाणा ते गोरेगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची सोनी नाक्याजवळ निवडणूक विभागाच्या एफएसटी व एसएसटी पथक प्रमुख बाबा शिंदे, सरिता लिल्हारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप, रामानंदा दास, श्यामकला भोयर, संदीप पटले यांनी कारची तपासणी केली. दरम्यान कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. यावेळी तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करुन ही रक्कम सील करण्यात आली. पंचनामा ईएसएमएस अँपवर भरून पुढील कारवाई केली. पोलिस निरीक्षक अजय भुसारी व पोलीस उपनिरीक्षक घोलप यांनी कायदेशीर कार्यवाही केली. या कारवाईसाठी तहसीलदार गोमासे व निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची असून त्यापुर्वीच निवडणुकीसाठी पैशाची वाहतूक सुरु झाली आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने बुधवारी तब्बल पावने दोन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.