दोन दुचाकीस्वार ठार, एक गंभीर
By Admin | Updated: February 20, 2015 01:23 IST2015-02-20T01:23:49+5:302015-02-20T01:23:49+5:30
आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार..

दोन दुचाकीस्वार ठार, एक गंभीर
साखरीटोला : आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. आजपर्यंत अनेक बळी घेणाऱ्या या वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून सदर वळण मृत्युचा सापळा झाले आहे.
दि. १८ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान भरधाव मोटारसायकलची वळणावर असलेल्या झाडाला धडक बसली. यामुळे दोन इसम जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये शंकर धनुराम पाचे (२१) मु. सतोना, सोनू उर्फ नरेश पाचे (२१) मु.बालाघाट यांचा समावेश आहे. ताराचंद धर्मू पाचे (२५) मु.सतोना जि. गोंदिया हा इसम गंभीर जखमी झाला.
अपघातग्रस्त मोटारसायकल होंडा कंपनीची असून नव्याने खरेदी करण्यात आली होती. तिघे मित्र साखरीटोला तेथे फिरायला आले होते. तेथून हरदोलीकडे परत जाताना तेलीटोला वळणावर मोटरसायकल चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे गंभीर दुखापत होवून बराच वेळपर्यंत तिघेही घटनास्थळीच पडून होते. त्यात दोघांचा बळी गेला.
सालेकसा पोलिसांना याची माहिती मिळताच रात्रीच्या १२ वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविण्यात आले. या घटनेने सदर वळण हे नवीन वाहनधारकांसाठी मृत्युचे कारण बनत असल्याची प्रचिती आली. पुन्हा सदर वळणावर अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
नियोजित पत्नीला भेटायला मित्रासह गेला होता
या अपघातातील गंभीर जखमी ताराचंद धर्मू पाचे याचे काही दिवसांपूर्वीच हरदोली येथील बालाराम पाचे यांच्या मुलीशी लग्न जुळले आहे. त्यामुळे ताराचंद व त्याचे दोन सोबती सासूरवाडीला महाशिवरात्रीनिमित्त आले होते. बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिघेही साखरीटोल्याला फिरायच्या निमित्ताने आले होते. पण तेथून परत जाताना त्यांच्यातील दोघांवर काळाने झडप घातली. एका दुचाकीवर तिघेजण बसणे त्यांना महागात पडले.
बांधकाम विभाग अजूनही निद्रावस्थेत
अनेकदा या वळणावर बरेच अपघात होऊन कित्येक जणांचा हकनाक बळी जात असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काही घेणे-देणे नसल्याचे जाणवते. इतके अपघात होऊनही या ठिकाणी ‘अपघातप्रवण स्थळ’ अशी सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही. अतिवळण असल्याने येथे अपघात होतात. जर सदर वळणाचे सरळीकरण झाले तर अपघात टाळता येतील. याबाबतीत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून जागृती केली आहे. मात्र अधिकारी निद्रावस्थेत आहेत. त्यामुळे सदर वळणाचे सरळीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सालेकसाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, ओबीसी आघाडीचे पप्पू राणे, पृथ्वीराज शिवणकर, मुलचंद कटरे, धनजित बैस यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.