भिंत फोडून मोबाईल गॅलरीतून पाच लाखाचे मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या दोघांना अटक
By नरेश रहिले | Updated: January 15, 2024 15:20 IST2024-01-15T15:20:08+5:302024-01-15T15:20:32+5:30
आमगाव पोलिसांची कारवाई: २८ पैकी दोन मोबाईल केले हस्तगत

भिंत फोडून मोबाईल गॅलरीतून पाच लाखाचे मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या दोघांना अटक
गोंदिया: आमगावच्या पाणी टाकी जवळील शिवणकर चाळ मध्ये असलेल्या पवार मोबाईल गॅलरीच्या मागणी भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ६० हजार रूपये किंमतीचे २८ मोबाईल २ ऑक्टोबर रोजी सकाळी पळविले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना झारखंडच्या राधानगर पोलीस ठाणे हददीतील पियारपुर गावातून अटक करण्यात आली. लुटू शेख (३०) व असरुद्दीन शेख (४०) झारखंड अशी आरोपींची नावे आहेत.
आमगाव तालुक्याच्या बंजारीटोला येथील दुर्गेश डिगलाल गौतम यांच्या पवार मोबाईल गॅलरीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. आमगावच्या गांधी चौक ते कामठा चौक दरम्यान असलेल्या जून्या पाणी टाकीच्या जवळ शिवणकर चाळ आहे. या चाळमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पवार मोबाईल गॅलरी उघडण्यात आली. १ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या मोबाईल गॅलरीच्या मागील भागाची भिंत तोडून त्या मोबाईल गॅलरीतून अत्यंत महागडले असलेले २८ मोबाईल पळविले. त्या मोबाईलची किंमत ५ लाख ६० हजार सांगितली जाते. या मोबाईल गॅलरीचे मालक दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला हे २ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांच्या दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईलवर आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क केला. आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना झारखंड येथून अटक केली आहे.
आरोपी होते बांगलादेशात पळण्याच्या तयारीत
आरोपी लुटू शेख (३०) व असरुद्दीन शेख (४०) हे बांगलादेशामध्ये पळून जाण्याचा तयारीत असतांना आमगाव पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना पकडून त्यांच्या जवळील दोन मोबाईल हस्तगत केले आहे.