तिरोड्यात गुंतागुंत वाढली
By Admin | Updated: October 18, 2014 01:39 IST2014-10-18T01:39:18+5:302014-10-18T01:39:18+5:30
अनेक पक्षांनी दावेदारी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट नाकारले. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काहींनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट...

तिरोड्यात गुंतागुंत वाढली
तिरोडा : अनेक पक्षांनी दावेदारी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट नाकारले. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काहींनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन तर काहींनी बंडखोरी करून अपक्ष लढणे पसंत केले. या प्रकारामुळे नाराज झालेल्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार न करता दुसऱ्यांना साथ दिली. यामुळे एकूण गुंतागुंतीच्या झालेल्या या निवडणुकीत जय-पराजय कुणाचा हे ठरविणे अत्यंत कठीण झाले आहे.
तिरोडा विधानसभा क्षेत्रात तिरोडा तालुका व गोरेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. यात मुख्य लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पी.जी. कटरे, शिवसेनेचे पंचम बिसेन, बहुजन समाज पक्षाचे दीपक हिरापुरे, भाजपचे विजय रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर व अपक्ष दिलीप बन्सोड यांच्यात झाली.
पी.जी. कटरे यांचे राहणे गोरेगावातील असून ते गोरेगाव तालुक्यातील एकमेव उमेदवार होते. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील अधित मते त्यांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु काँग्रेसचीच उमेदवारी मिळविण्यासाठी उत्सुक असलेले तिरोडा तालुक्याचे राधेलाल पटले व योगेंद्र भगत यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा या क्षेत्रात होती. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. भाजप पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी सज्ज असताना आ. खुशाल बोपचे यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सक्रीयता दाखविली नाही. दुसरी बाब म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले व कधी भाजपचेच असलेले पंचम बिसेन यांनाही शिवसेनेच्या तिकिटावर लढणे पसंत केले.