धनत्रयोदशीला गोंदियात कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: October 21, 2014 22:52 IST2014-10-21T22:52:54+5:302014-10-21T22:52:54+5:30
धनत्रयोदशी, अर्थात धनसंचय करण्याचा दिवस. या दिवशी सोन्या-चांदीसह भांड्यांची खरेदी केल्याने घरात समृद्धी नांदते अशी भावना आहे. त्यामुळे गोंदिया शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची

धनत्रयोदशीला गोंदियात कोट्यवधींची उलाढाल
गोंदिया : धनत्रयोदशी, अर्थात धनसंचय करण्याचा दिवस. या दिवशी सोन्या-चांदीसह भांड्यांची खरेदी केल्याने घरात समृद्धी नांदते अशी भावना आहे. त्यामुळे गोंदिया शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची दुकाने मंगळवारी चांगलीच गजबजून गेली होती. एकट्या गोंदिया शहरात ५ कोटी रुपयांच्या सुवर्ण आणि चांदीच्या दागिने व वस्तूंची खरेदी नागरिकांनी केली. तसेच भांडी आणि इतर वस्तू मिळून १० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल मंगळवारी गोंदियात झाली.
भांड्यांच्या खरेदीसाठीही महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. घरात उपयोगी पडणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तूंच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. त्यात स्टिलच्या भांड्यांसह तांब्याच्या आणि पितळी भांड्यांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे गोंदियातील दुकानदारांनी सांगितले. दररोज भांड्यांची विक्री जेवढी होते, त्यापेक्षा १५ ते २० टक्के विक्री अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर प्रत्येक भांड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी दिसत होती. ही गर्दी रात्रीपर्यंत कायम होती.
सुवर्ण बाजारात तर अनेक दुकानांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. सोन्याचा दर मंगळवारी २४ कॅरेटसाठी २८,००० रुपये तोळा तर २३ कॅरेटसाठी २६,९५० रुपये प्रतितोळा होता. हाच दर गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रतितोळा १ हजार रुपयांनी कमी होता. मात्र मंगळवारी दर जास्त असतानाही लोकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधन खरेदीसाठी झुंबड केली. यासोबतच चांदीचा दर ४० हजार रूपये किलो असा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत चांदी स्वस्त झाल्यामुळे चांदीच्या वस्तू खरेदीकडेही नागरिकांचा कल दिसून आला. (जिल्हा प्रतिनिधी)