नळ ओकताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:53 IST2016-05-16T01:53:38+5:302016-05-16T01:53:38+5:30

पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

Turbulence nauseous turbid water | नळ ओकताहेत गढूळ पाणी

नळ ओकताहेत गढूळ पाणी

गोंदिया : पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे तिरोडावासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र सपशेल दुर्लक्ष आहे.
गोंदियानंतर महत्त्वाचे शहर म्हणून तिरोडा शहराची ओळख आहे. अदानी वीज प्रकल्पासह तिरोडा तालुक्यात धापेवाडा सिंचन योजना आहे. शिवाय पाणी टंचाईच्या काळात बावणथडी प्रकल्पातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे तिरोडा शहरात साधारणत: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकत नाही. असे असतानाही आजघडीला शहरातील नळ मात्र गढूळ पाणी ओकत आहेत.
तिरोडा शहरातील शहीद मिश्रा वॉर्डमध्ये शनिवारी सकाळी नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. सुरूवातीला १५ मिनिटे नळांना स्वच्छ पाणी आले. मात्र त्यानंतर अत्यंत गढूळ पाणी नळांतून निघू लागले. हे पाणी लालसर रंगाचे अत्यंत गढूळ असून ते पिण्यायोग्य नव्हते. शिवाय हे पाणी भांडीकुंडी व कपडे धुणे याशिवाय इतर कामांसाठीही उपयोगी नव्हते. अशात असे गढूळ पाणी तिरोडावासीयांना नळाद्वारे मिळत आहे. शहरात आधीच पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अनेक वॉर्डातील नळांना पाणी येत नाही. काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन असल्यामुळे संतुलित प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. संबंधित विभागाने त्या जुन्या पाईप लाईन काढून नवीन पाईप लाईन घातल्या नाही. तर दुसरीकडे ज्या वॉर्डांत पिण्याचे पाणी नळांना येत आहे, तेथे गढूळ पाणी पुरविले जात आहे. या प्रकाराकडे त्वरित लक्ष पुरवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा तिरोडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच असे झाल्यास यासाठी सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण्यात येईल, असा इशारा तिरोडावासीयांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Turbulence nauseous turbid water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.