मंत्रोपचाराने रंगला ‘तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळा

By Admin | Updated: December 2, 2015 01:56 IST2015-12-02T01:56:59+5:302015-12-02T01:56:59+5:30

तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल

'Tulsi-Shaligram' weddings with chantashrama | मंत्रोपचाराने रंगला ‘तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळा

मंत्रोपचाराने रंगला ‘तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळा

दोन हजार पाहुणे : अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांचा अभिनव उपक्रम
सालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा ‘तुळशी विवाह’ करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांच्या हा अभिनव उपक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय झाला आहे.
हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळींना रितसर निमंत्रण, दोन हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार आणि मंगलाष्टके अशा थाटात तुळसी आणि शालिग्रामचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी पार पडला.
हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाह केल्यानंतरच प्रत्यक्ष वर-वधूचे लग्न कार्य पार पाडण्याला सुरुवात केली जाते. ही परंपरा आपल्या देशात हजारो वर्षापासून सुरू असून आजही लोक तुळशी विवाह घेण्याची वाट बघत असतात. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरची व शेजऱ्यांकडील मंडळींपर्यंत मर्यादित असते.
अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी संपूर्ण गावाला निमंत्रण देत आपआपल्या इष्ट मित्रांना तसेच अधिकारी, पदाधिकारी वर्ग आणि भाविकांना व विविध संघटनांना सुद्धा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरुन जवळपास दोन हजार पाहुणे मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या. प्रवेशद्वारावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून घेतली.
या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे धर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारित करण्यात आली. लग्न विधी व मंत्रोपचार विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.) येथील ककोडी येथून पंडित विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी हिंदू वैदिक पद्धतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. सर्व मंत्रोपचार, पूजन व मंगलाष्टके इत्यादीनंतर तुळशी व शालीग्राम यांना लग्नमाळ घालण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष गोविंद वरखडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद शाहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, विद्यार्थी पात्र श्रीनुवई, रमेश फरकुंडे, संतोष कापसे, मुनेश्वर कापसे, टोनेंद्र बिसेन, भरत शाहू, नवीन भेंडारकर, लोकेश कोरे, सजित सांगोळे व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

गोरगरिबांचे लग्न लावून देणार
या सोहळ्यासाठी वधू आणि वर पक्ष तयार करण्यात आले होते. त्यातून वर-वधूच्या मामाची भूमिका पार पाडत दोघांनी अंत:पट पकडून ठेवला होता. मंगलाष्टके नंतर लग्न गीते, बँड वाजा, नृत्य इत्यादींची मन मोहून टाकणारी प्रस्तुती सादर केली. सर्व दोन हजार पाहुण्यांसाठी नवयुवकांनी पंगत लावून जेवणासाठी सोय करुन दिली.
याप्रसंगी त्या नवयुवकांनी आपल्या इच्छा, भावना व्यक्त करीत परिसरात एखाद्या कुटुंबात गरिबीमुळे समस्या निर्माण होत असेल अशा कुटुंबाचे लग्न ते नवयुवक या ठिकाणी आपल्या मदतीने पार पाडून देतील, असे सांगण्यात आले.

Web Title: 'Tulsi-Shaligram' weddings with chantashrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.