संपूर्ण उपचार केल्यास क्षयरोग बरा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:18 IST2019-03-18T22:17:40+5:302019-03-18T22:18:01+5:30
जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी केले.

संपूर्ण उपचार केल्यास क्षयरोग बरा होतो
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी केले.
येथील भवभूती महाविद्यालयात दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्था व जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी यांच्या संयुक्तवतीने आयोजीत क्षयरोग जनजागृती पंधरवड्याचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. भुस्कुटे होते. पाहुणे म्हणून दृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन चौधरी, नरेश रहिले, प्रज्ञा कांबळे, धनेंद्र कटरे, मंजूश्री मेश्राम उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ. पराडकर यांनी, क्षयरोगामुळे वर्षाकाठी १२ हजार कोटींचे नुकसान देशाला सहन करावे लागते. देशात मातामृत्यूंपेक्षा क्षयरोगाने अधिक महिलांचा मृत्यू होतो. गंभीर स्वरूपाच्या क्षयरोगाचे प्रमाण बालकांमध्ये अधिक आहे. योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण बालकांचे अधिक आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण उपचार करुन घ्यावा उपचार मधातच सोडल्यास त्याचे गंभीर परिणाम त्याच रूग्णाला भोगावे लागतात असे सांगितले.
डॉ. भुस्कुटे यांनी, हा रोग बरा होणारा असून हे आजार जडू नये यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. डॉ. चौधरी यांनी, क्षयरोगावर आता सर्जीकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे. यासाठी देशातील तरूणांनी ही धूरा आपल्या खांद्यावर घ्यावी असे मत व्यक्त केले. मेश्राम यांनी, क्षयरोगामुळे वर्षाकाठी ३ लाख बालके शाळा सोडत असल्याचे सांगीतले.
प्रास्ताविक समन्वयक जितेंद्र पारधी यांनी मांडले. संचालन प्रज्ञा भगत यांनी केले. आभार आरोग्य समिती सदस्य प्रा. पी.एम.लोणारे यांनी मानले. यावेळी भवभूती महाविद्यालयातील प्रा. विजय फुंडे, प्रा. व्ही.व्ही. दाणी, डॉ. तारा हुंगे, डी.एल. राणे, प्रा. अपर्णा फाळके (कटरे), प्रा. मृणाली लिल्हारे, डॉ. बुध्दघोष शिंगाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
२४ रोजी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम
२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन असल्यामुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरोग जागृतीचे कार्यक्रम दृष्टी बहुद्देशिय विकास संस्थेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली आहे.