ग्रामीण भागात कोविडचा संसर्ग रोखण्याकरिता प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:51+5:302021-04-26T04:25:51+5:30
गोरेगाव : ग्रामीण भागातही काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. बहुतांश लोक ताप, सर्दी, ...

ग्रामीण भागात कोविडचा संसर्ग रोखण्याकरिता प्रयत्न करा
गोरेगाव : ग्रामीण भागातही काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. बहुतांश लोक ताप, सर्दी, खोकला झाल्यास कोविडची तपासणी करण्याकरिता घाबरत आहेत. आरोग्य विभागाला न कळविता आपल्या मर्जीने ४ ते ५ दिवस औषधे घेत असतात. यामुळे संसर्गात वाढत होत असून, नागरिकांनी वेळीच जागरूक होण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी दिले.
ग्रामीण भागातील रुग्ण शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य विभागाकडे धाव घेत असून, कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याकरिता ग्रामीण स्तरावर आशा सेविका, सरपंच, ग्रामसेवक यांच्या मार्फत माहिती घेऊन अशा रुग्णांची कोविड चाचणी करणे, १८ वर्षांवरील सर्वांना लस घेण्यास प्रवृत्त करणे, जिथे कोविडचे रुग्ण जास्त आढळतात, अशा ठिकाणी आरोग्य विभागामार्फत शिबिर लावणे, एखादी व्यक्ती बाहेरून आली असल्यास त्याची आशा सेविकांमार्फत ऑक्सिजन पातळी, तापमान तपासून आरोग्य विभागास कळविणे, संशयित रुग्ण आढळल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा आदी सूचना आ. विजय रहांगडले यांनी केल्या. तालुक्यातील सोनी येथील आरोग्य उपकेंद्रात त्यांनी तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला रेखलाल टेंभरे, गोरेगाव माजी नागराध्यक्ष आशिष बारेवार, उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे, तहसीलदार सचिन गोस्वामी, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी चांदेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीतू पारधी, सोनी येथील सरपंच खेमेश्वरी हरिणखेडे, उपसरपंच झनक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता भोजराज पटले उपस्थित होते.