तावशी बायपासवर ट्रक फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST2021-09-22T04:33:08+5:302021-09-22T04:33:08+5:30
अर्जुनी - मोरगाव : शहरातील तावशी बायपास रोडवर ट्रक फसल्याने ४ तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २१) ...

तावशी बायपासवर ट्रक फसला
अर्जुनी - मोरगाव : शहरातील तावशी बायपास रोडवर ट्रक फसल्याने ४ तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली. रस्त्याच्या मधोमध ओव्हरलोड ट्रक फसल्याने तब्बल ३ तास वाहनांची दुतर्फा रिघ लागली होती.
गोंदिया - कोहमारा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. गणेशनगरलगत इटियाडोह धरणाच्या कालव्यावर पुलाचे बांधकाम निर्माणाधीन आहे. शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट आहे. पुलालगत रस्ता वळतीकरणाची सोय नसल्याने यामार्गे होणारी संपूर्ण वाहतूक शहरातून तावशी बायपासमार्गे वळती करण्यात आली आहे. साधारण रस्त्यावर ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने या मार्गाची वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे गोंदिया येथून तालुक्यातील वडेगावला सिमेंट वाहतूक करणारा एमएच ३५ एजे २३५९ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या मधोमध फसला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मालवाहक गाड्यांच्या रांगांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. जेसीबीच्या मदतीने या ट्रकला सुरळीत काढण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी मोर्चा सांभाळला होता.
---------------------
शहरातून होणारी जड वाहतूक नगरपंचायतीने बंद करावी
यामार्गे होणारी वाहतूक शहरातून वळती झाल्याने शहरात गाड्यांची वर्दळ वाढून अपघातांची शक्यता बळावली आहे. शहरातील रस्ते खराब झाले आहेत. शहराच्या मध्य भागातून ही वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातून होणाऱ्या वाहतुकीवर नगर पंचायतीने निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.
210921\1834-img-20210921-wa0011.jpg
तावशी बायपासवर ट्रक फसल्याने वाहनांची लागलेली रीघ