कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST2021-07-30T04:30:55+5:302021-07-30T04:30:55+5:30
बोंडगावदेवी : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक ...

कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा ()
बोंडगावदेवी : मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२८) जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहाने यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
लेखा अधिकारी अशोक बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्त प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित वेतन निश्चिती फाईल त्वरित निकाली काढण्यात याव्या, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी,शिक्षक व अधिकाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद करून प्रलंबित निधी तातडीने देण्यात यावा, प्रलंबित रजा रोखीकरण राशी व पेंशन विक्री अंशकरण राशी तातडीने अदा करण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रलंबित कालबद्ध पदोन्नती, भविष्य निर्वाह निधी अन्वये कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे, त्यांना भविष्य निर्वाह निधी पावती दरवर्षी देण्यात यावी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या प्रलंबित भविष्य निर्वाह निधी पावती तातडीने देण्यात यावी, पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांची माहे नोव्हेंबर २०१९ ची मासिक कपात भविष्य निर्वाह निधी मधून जमा करण्यात यावी, डीसीपीएस. धारकांच्या कपातीचा हिशोब करुन त्यांना तातडीने कपातीची पावती देण्यात यावी आदी विषय मांडण्यात आले. यावेळी सर्व समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाहाने यांनी दिले. शिष्टमंडळात महासंघाचे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, अति. सरचिटणीस अजय कोठेवार, जितेंद्र बोरकर, रितेश शहारे, विरेंद्र भोवते, रोशन गजभिये, अविनाश गणवीर, पी.पी. शेगोकार यांचा समावेश होता.