कष्टकरी शेतकऱ्यांचे समस्याग्रस्त जीवन
By Admin | Updated: December 3, 2014 22:53 IST2014-12-03T22:53:04+5:302014-12-03T22:53:04+5:30
गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.

कष्टकरी शेतकऱ्यांचे समस्याग्रस्त जीवन
मुंडीकोटा : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. अनेक शेतकरी शेतीच्या धंद्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह करणे, मुला-मुलींना शिक्षण देणे, त्यांचे लग्न करणे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो.
सद्यस्थितीत शेती हा व्यवसाय परवडण्यासारखा राहिला नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. पण वडिलांची परंपरा सुरू ठेवावी लागते. त्यातही वेळोवेळी निसर्ग साथ देत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी मजुरांचे दरसुद्धा गगणाला भिडले आहेत. तसेच रासायनिक खते, किटकनाशक औषधे यांच्याही भावात मोठीच वाढ झाली आहे. सर्वत्र शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा भाव वाढले आहेत.
या युगात शेतकरी बैलबंडीचा उपयोग करीत नाहीत. रोवणीत ट्रॅक्टर भाड्याने केला जातो. महिलांना रोजच १५० ते १६० रूपये मजुरी द्यावी लागते. पुन्हा एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना शेतातील निंदन करावे लागते. नंतर रासायनिक खते व औषधांची फवारणी करावी लागते. दिवाळीत हलके धान निघतात. त्यामुळे धान कापणे, ते मजुरांच्या हस्ते एका बांधीत जमा करणे ही कामे केली जातात. त्यांची मजुरी यावेळी शेतकऱ्यांना २०० रूपययेप्रमाणे द्यावी लागते. यानंतर ट्रॅक्टर लावून त्यांची मळणी केली जाते. ऐवढा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो, पण हातात एकही रूपया मिळत नाही. याचे कारण म्हणजे भयंकर वाढलेली महागाई.
दिवाळी झालयनंतरच हलक्या धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपले धान व्यापाऱ्यांना विकत असतात. व्यापारी पडल्याभागात त्या धानाची खरेदी करून शेतकऱ्यांना लुबाडतात. पण गरजवंताना अक्कल नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. पण आवश्यक खर्चाकरिता धान विकणे गरजेचे असते.
यावेळी धान खरेदी केंद्र सुरू झाले असून धान खरेदी केंद्रावर माल ठेवण्याकरिता जागा नाहीत. अनेक शेतकऱ्यांचा माल बाहेर पडून आहे. बरेच दिवस धानाचा काटा होत नाही. माल बाहेर ठेवल्यावरही धान खरेदी केंद्रावर रात्रीच्या वेळी चौकीदार नाहीत. त्यामुळे बाहेरील पडलेले धानाची पोती चोरीस गेले तर जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
धान खरेदी केंद्रावर धान दिले तर त्यांचा चुकारा एक ते दोन महिन्यापर्यंत मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. ‘पिकेल तर विकेल’ पण काय? अनेक संकटाला तोंड देवून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांकरिता जो दिवस उगवतो तो सारखाच दिसत असतो. नेतेमंडळी येतात आम्ही हे, ते करू, पण करत काहीच नाही.
फक्त शेतकऱ्यांना आशेवर जगवत असतात. दिवसभर काबाळकष्ट करून आपले जीवन शेतकरी जगतात, पण शेवटी मिळते काय? हलाकीचे, दरिद्रतेचे केवळ कष्टमय जीवन. (वार्ताहर)