आदिवासी युवक-युवतींनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:35 IST2017-04-24T00:35:14+5:302017-04-24T00:35:14+5:30
माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता ...

आदिवासी युवक-युवतींनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी
सहषराम कोरोटे : धुर्व गोंड समाजाची १७ जोडपी विवाहबद्ध
देवरी : माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता रोजगाराच्या शोधात इतरत्र कुठेही न भटकता आदिवासी समाजातील युवक-युवतींनी गावातच लहान-लहान लघु उद्योग उभारावे. आपले आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावे. आपण स्वत: आत्मनिर्भर झालो तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आपला आदिवासी समाज हा प्रगतीपथाकडे वाटचाल करेल. एक विकसीत समाज म्हणून लोक आपल्या समाजाकडे पाहतील. यासाठी आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास आणि समाजाची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर आदिवासी समाजातील युवक-युवतींनी लहान लघु उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराकडे आपली वाटचाल करावी, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
ते शनिवार (दि.२२) देवरी तालुक्यातील धामनझोरी-धमदीटोला (घोनाडी) येथे पार पडलेल्या आदिवासी धुर्व गोंड समाजाच्या १७ जोडप्याच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्ज्वलन ओराडबांधचे समाज महासभाचे अध्यक्ष धन्नुलाल उईके यांनी केले. धुर्व समाज धमधागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, जि.प. सदस्य अलताफ हमिद, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, उपाध्यक्ष धनपत भोयर, अमित विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. रामटेके, सरपंच अंतकला वाढई, ग्रा.पं. सदस्य उदाराम धानगाये, माजी उपसभापती इंदल अरकरा, सुधाकर कोकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश राऊत, समाजाचे जिल्हा सचिव राधेलाल सलामे, जिल्हा सदस्य रामेश्वर पदाम यांच्यासह गावागावातून शेकडोच्या संख्येत आदिवासी समाजातील महिला पुरुष व युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी १७ विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांना मंगलमय सांसारिक जीवनाच्या त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
कोरोटे पुढे म्हणाले, आजच्या दैनंदिन महागाईच्या जीवनकाळात आदिवासी समाजातील लोकांना आपले श्रम, धन व वेळेची बचत करायचे असेल तर आपल्या मुलामुलींचे लग्न अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यात करावे. ही आजच्या काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान आ. संजय पुराम, एम.डी. ठाकूर, धन्नुलाल उईके, इंदल अरकरा, भरतसिंग दुधनाग, हरिचंद उईके आदींनी उपस्थितांना समायोजित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक माजी पं.स.सदस्य सोनू नेताम यांनी मांडले. संचालन पंचराम मडावी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)