आदिवासी सोसायटीचे दीड हजार क्विंटल धान सडले

By Admin | Updated: September 21, 2015 01:38 IST2015-09-21T01:38:33+5:302015-09-21T01:38:33+5:30

एकीकडे जेथे सहकारी सोसायटीच्या माध्यमाने आदिवासी विकास महामंडळाने समर्थन मूल्यावर धानाची खरेदी केली ...

Tribal Society's 1.5 thousand quintals of rice wasted | आदिवासी सोसायटीचे दीड हजार क्विंटल धान सडले

आदिवासी सोसायटीचे दीड हजार क्विंटल धान सडले

निष्काळजीपणा : आदिवासी विकास महामंडळ जबाबदार
सालेकसा : एकीकडे जेथे सहकारी सोसायटीच्या माध्यमाने आदिवासी विकास महामंडळाने समर्थन मूल्यावर धानाची खरेदी केली तर दुसरीकडे उघड्यावर ते धान टाकण्यात आले. धान पावसात ओले होऊन एक हजार ५०० क्विंटल धान सडले. मात्र या घटनेत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
व्यापाऱ्यांना लाभ व्हावा याच हेतूने जाणीवपूर्वक आदिवासी महामंडळाने धान उघड्यावर ठेवले. हे अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांना लाभ पोहोचविण्याचे षडयंत्रसुद्धा असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामाचे धान महामंडळाने सालेकसा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून खरेदी केले होते. परंतु खरेदी करण्यात आलेले धान ठेवण्यासाठी गोदाम नसल्यामुळे ते उघड्यावर ठेवण्यात आले. धानाला ताडपत्रीने झाकण्यात आले होते. परंतु जून महिन्यात आलेला वादळ व पावसामुळे सदर ताडपत्री फाटली. सोसायटीकडून वारंवार नवीन ताडपत्रीची मागणी करण्यात आली. परंतु महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. याचाच परिणाम म्हणून जुलै महिन्यापासून आतापर्यंत आलेल्या पावसात सदर धान पूर्णपणे ओले होऊन सडले. ही बाब माहीत होताच खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यासाठी व्यापाऱ्यांचे ट्रक सोसायटीमध्ये लावण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांनी सोसायटीमध्ये पोहोचून सडलेल्या धानाचे निरीक्षण केले. महामंडळाद्वारे खरेदी करण्यात आलेल्या एक हजार ५०० क्विंटल धान पूर्णपणे सडला. हे धान २० लाख रूपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Tribal Society's 1.5 thousand quintals of rice wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.