स्मशानातील झाड झाले विद्यार्थ्यांसाठी मोबाईल टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:02+5:302021-07-07T04:36:02+5:30

राजीव फुंडे आमगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टी प्रथमच घडल्या आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन ...

The tree in the cemetery became a mobile tower for the students | स्मशानातील झाड झाले विद्यार्थ्यांसाठी मोबाईल टॉवर

स्मशानातील झाड झाले विद्यार्थ्यांसाठी मोबाईल टॉवर

राजीव फुंडे

आमगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टी प्रथमच घडल्या आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या गंभीर असल्याने विद्यार्थ्यांना झाडावर बसून ऑनलाईन क्लासेस व अभ्यासक्रम पूृर्ण करावा लागत आहे. तालुक्यातील बनगाव येथील विद्यार्थी चक्क स्मशानभूमी परिसरातील झाडावर बसून ऑनलाईन क्लासेस करीत असून हे झाडच त्यांच्यासाठी आता मोबाईल टॉवर झाले आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलपासून पाल्यांना दूर ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या पालकांना पाल्यांच्या हातात मोबाईल देण्याची वेळ आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. स्पर्धा परीक्षा किवा अन्य परीक्षासुध्दा ऑनलाईनच होत आहेत. त्यामुळे मोबाईल ही आवश्यक गरज झाली. या सर्व गोष्टींचा फटका मोबाईलचे नेटवर्क नसलेल्या गावातील विद्यार्थ्यांना बसत आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील बनगाव येथे पाहायला मिळत आहे. या गावात नेटवर्क मिळत नसल्याने येथील विद्यार्थी परीक्षा आणि ऑनलाईन क्लासेस हे स्मशानभूमीतील वडाच्या झाडावर बसून ज्वाईन करीत आहेत. त्यामुळे हे वडाचे झाडच या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल टॉवर झाले आहे. ग्रामीण क्षेत्रात नेटवर्कअभावी घरात नेहमी अभ्यास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. ऐनवेळी नेटवर्क गेल्यावर स्पर्धा परीक्षा किंवा इतर अभ्यासापासून वंचित राहावे लागते. अशावेळी स्मशानभूमीतील हे वडाचे झाड विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

.........

ओमशांती मोक्षधाम समितीने केली व्यवस्था

स्मशानभूमी परिसरातील झाडांवर बसून विद्यार्थी ऑनलाइन क्लासेस करीत असल्याने बनगाव येथील ओमशांती मोक्षधाम समितीने या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर स्वच्छ सुंदर करून दिला आहे. या ठिकाणी बसण्याकरिता टेबलचीसुध्दा व्यवस्था केली आहे. स्मशानभूमीत जाऊन कुणी अभ्यास करीत नाही. पण, हे विद्यार्थी अंधश्रध्देला थारा न देता नियमित येथे जाऊन अभ्यास करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ओम शांती मोक्षधाम समितीतर्फे नियमित या परिसराची स्वच्छतासुध्दा करून हा परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

.....

स्मशानभूमी झाली विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र

बनगाव येथील ओम शांती मोक्षधाम समितीतर्फे स्मशानभूमीत विविध विकासकामे व वृक्षारोपण करून या परिसराला बागेचे स्वरुप दिले आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन अभ्यास करतात. मागील दीड वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अभ्यासकेंद्र झाल्याचे चित्र आहे. पोलीस भरती, आर्मी भरती, बँक आणि शिक्षक भरती अशा अनेक पदांसाठीच्या परीक्षेकरिता मुले ऑनलाईन अभ्यासाची तयारी येथेच करतात.

.........

(फोटो : जीएनडीपीएच ०१)

Web Title: The tree in the cemetery became a mobile tower for the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.