कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:09+5:302021-02-09T04:32:09+5:30
एटीएम होत आहेत कोरोना संसर्गाचे केंद्र गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, बँका, तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर, तसेच ...

कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
एटीएम होत आहेत कोरोना संसर्गाचे केंद्र
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, बँका, तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नसून, शहरातील सर्वच एटीएम केंद्र सध्या कोरोना संसर्गाचे केंद्र झाले आहेत.
रेतीच्या साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेतीघाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, बारमागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो. मात्र, याकडे तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
सालेकसा रस्त्यावरील खड्डा बुजवा
आमगाव : येथील सालेकसा रस्त्यावरील जुन्या तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा दिसून येत नसल्याने येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबर महिन्यात पाच दुचाकी चालक खड्ड्यांत पडून गंभीर जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. येथून डोंगरगडसाठी भाविक अधिक प्रमाणात प्रवास करतात. अशात मोठा अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा बुजवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
तिरोडा : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने सांडपाणी व कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाहीत.
दूध भेसळीच्या चौकशीची मागणी
सालेकसा : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करूनही पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू असल्याने चौकशीची मागणी होत आहे.
महिला परिचर मानधनापासून वंचित
आमगाव : जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आमगाव व गोरेगाव तालुक्यातील अंशकालीन स्त्री परिचरांना मागील आठ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.
रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
आमगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मात्र वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावर कारवाई करणार काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.
नाल्या तुंबलेल्या
सालेकसा : शहरातील अनेक वॉर्डांतील नाल्या कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. वारंवार सांगूनही नाल्यांमधील गाळ पूर्णत: उपसण्यात येत नाही. परिणामी, डासांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. धूर फवारणीची मागणी नागरिकांनी केली आहे.
विडी उद्योगांवर उतरती कळा
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एके काळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगावर उतरती कळा लागली आहे. हा उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. हजारो विडी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कामगारांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे.
बाजारात असुविधा
गोंदिया : येथील गुजरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान बाजारात घाणच घाण दिसून येत आहे. दुर्गंधीयुक्त घाण पसरत आहे. परिसरात दुर्गंधीयुक्त गंध पसरतो, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातात वाढ
गोंदिया : गोंदिया राज्य महामार्गावर देव्हाडी ते माडगीदरम्यान रस्त्याशेजारील मोठ्या वृक्षांच्या फांद्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर तुडून पडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या फांद्या तोडण्यात याव्यात, अशी मागणी आहे.
महामार्गावर वाहतुकीची कोंडी
गोंदिया : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने, शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. संध्याकाळच्या वेळी अनेकदा थांबावे लागते.