रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाश्यांची लूट करणारी टोळी सक्रिय
By Admin | Updated: October 26, 2014 22:43 IST2014-10-26T22:43:29+5:302014-10-26T22:43:29+5:30
सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. आपण आपल्या कुटुंबासह लोकल रेल्वेगाडीने प्रवास करीत असाल तर जरा सतर्क व्हा. आपल्यासोबत असलेल्या साहित्याकडे नजर ठेवा. आपल्याला गंडविणाऱ्या

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाश्यांची लूट करणारी टोळी सक्रिय
गोंदिया : सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. आपण आपल्या कुटुंबासह लोकल रेल्वेगाडीने प्रवास करीत असाल तर जरा सतर्क व्हा. आपल्यासोबत असलेल्या साहित्याकडे नजर ठेवा. आपल्याला गंडविणाऱ्या टोळीतील तरुण गर्दीचा फायदा घेऊन लुटण्याच्या बेतात आहेत. या लोकल रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांची गस्त नसल्याने प्रवाशांना लुटले जात आहे.
नागपूर-रायपूरच्या दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांमध्ये या टोळीतील सदस्य सक्रिय आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणारे हे टोळीतील सदस्य सहकुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सामानावर, महिलांच्या दागिन्यांवर तसेच पुरुषांच्या पाकिटावर नजर ठेवत असतात. या टोळीत सात ते दहा जणांचा समावेश आहे. तरुण वयातील असलेले हे धडधाकड सदस्य प्रवाशांना दमदाटी देण्यातही मागे-पुढे पाहत नाही. गर्दीचे ठिकाण पाहून आपल्याला कुठे हात साफ करता येईल, याच्याच बेतात असलेले हे सदस्य सहकुटुंब प्रवास करणाऱ्या कुटुंबालाच गंडविण्याचा प्रयत्नात असतात. मागच्या वर्षी दिवाळी तोंडावर असताना पेपर गँग सक्रिय झाली होती. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या पेपर गँगला वर्धा येथील पोलिसांनी अटक केली होती. यावर्षी मात्र अशाच प्रकारची प्रवाशांना लुटणारी गँग सक्रिय झाली आहे. मात्र या गँगमधील सदस्य सामान्य प्रवाशांसारखेच राहत असल्याने प्रवाशांना ते सहजासहजी ओळखणे कठीण आहे. मात्र प्रवाशांसोबत गर्दीचा फायदा घेऊन उभे राहणारे ते सदस्य दोन ते चार वेळा त्या डब्यातील प्रवाशांच्या सामानाकडे, महिलांच्या दागिन्यांकडे किंवा एखाद्याच्या फुगलेल्या पाकिटाकडे लक्ष घालतात. बहुतेकदा ते गाडीतील प्रवाशांशी एखाद्या विषयावर चर्चाही करतात. एखाद्या साधारण विषयावर चर्चा करण्यात मशगूल असलेल्या प्रवाशांच्या सामानावर त्याच टोळीतील एक सदस्य त्यांची नजर चुकवून हात साफ करीत असते. याच टोळीतील दोन सदस्य डब्यातील दोन कोपऱ्यांवर राहून सुरक्षा दलाचे जवान किंवा रेल्वे पोलीस गस्त तर घालत नाहीत याकडे लक्ष ठेवतात. डब्यातील प्रवाशांना धमकावून त्यांना लुटणे ही बाब या टोळीतील सदस्यांनी हेरून धरली.
या टोळीतील सदस्य प्रवाशांची सुटकेस उघडण्यासाठी नकली किल्लीचाही वापर करीत असतात. डब्यातील गर्दी पाहून गाडी फलाटावर थांबताच उतरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ब्लेडच्या साहाय्याने कापून पळवीत असतात. प्रवाशांचे सुंदर कपडे पाहून ते प्रवासी गरीब की श्रीमंत असा अंदाज व्यक्त करूनही ते चोरीच्या घटना घडवीत असतात.
एखाद्या महिलेने अंगावर दागिने घातले नाही म्हणजेच तिने आपले दागिने सुटकेसमध्ये ठेवले असावेत, असा ते ठाम निर्धार करून त्या महिलेच्या सुटकेसवर ते हात साफ करीत असतात. रेल्वेतील लोकल गाड्यांमध्ये अनेक प्रवाशांना लुटल्याची प्रकरणे गोंदिया रेल्वे पोलिसांकडे तक्रार म्हणून गेली. परंतु रेल्वे पोलिसांना या टोळीतील सदस्यांना पकडण्यात अद्याप यश आले नाही. रेल्वे पोलिसांची किंवा रेल्वे सुरक्षा दलाची या लोकल गाड्यांमध्ये गस्त नसल्याने ते सक्रिय सदस्य पोलिसांच्या हाती लागले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)