दिवाळीनंतर सुरू होणार ‘ट्राफिक सिग्नल’
By Admin | Updated: October 21, 2014 22:54 IST2014-10-21T22:54:13+5:302014-10-21T22:54:13+5:30
गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेत बिघाड झाला आहे. कुणी कोणत्याही ठिकाणातून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात.

दिवाळीनंतर सुरू होणार ‘ट्राफिक सिग्नल’
गोंदिया : गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेत बिघाड झाला आहे. कुणी कोणत्याही ठिकाणातून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघातही घडतात. या अस्ताव्यस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी गोंदिया शहरातील पाच चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहे. त्यांची चाचणी घेतली जात असून हे ट्राफीक सिग्नल दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे.
या ट्राफीक सिग्नलसाठी ४२ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. ही रक्कम केंद्र शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत देण्यात आली आहे.
गोंदिया शहरातील अरूंद रस्त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण झाल्यास नागरिक आपल्या चुकीचे खापर पोलिसांच्या डोक्यावर फोडतात.
नगर परिषदेचे दुर्लक्ष व शहरातील गल्यावर व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण या बाबीला लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा नेहमीच काम करीत असते. मात्र वाहतुकीची कोंडी झाल्यास प्रत्येक माणूस या कोंडीची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, अशी ओरड करतात. गोंदिया शहरातील वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ आहे.
गोंदिया शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस असतात. परंतु नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतुक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला तर ते वाहन न थांबविता पळून जातात. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, शक्ती चौक आणि विशाल मेगा मार्ट चौक या ठिकाणी ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात सध्या सिग्नल नसल्यामुळे कोणताही वाहन चालक कुठूनही घुसतो. यामुळे वाहतुकीचा बोजवारा नेहमीच उडाल्याचे लक्षात येते.
या ट्राफिक सिग्नलसाठी वाहतुक पोलिसांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतले आहे. या कामाचे कंत्राट नागपूर येथील डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. या सिग्नलची चाचणी वाहतूक विभागाने घेणे सुरू केले आहे. जयस्तंभ चौकातील सिग्नलचे ट्रायल आठवडाभरापूर्वी व नेहरू चौकातील सिग्नलचे ट्रायल चार दिवसापूर्वी करण्यात आले आहे. दिवाळीनंतर हे सिग्नल वाहतुक विभाग सुरू करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)