वाहतूक पोलिसांची दुचाकींवरच गाज
By Admin | Updated: May 18, 2015 00:50 IST2015-05-18T00:50:38+5:302015-05-18T00:50:38+5:30
बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर वाहतूक विभागाकडून बाजारात दुचाकी उचलून नेण्याची मोहीम राबविली जात आहे.

वाहतूक पोलिसांची दुचाकींवरच गाज
दुचाकी उचलण्याची मोहीम सुरूच : नागरिकांत वाहतूक विभागाप्रती रोष
गोंदिया : बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर वाहतूक विभागाकडून बाजारात दुचाकी उचलून नेण्याची मोहीम राबविली जात आहे. याशिवाय शहरात चौकाचौैकात दुचाकीधारकांना पकडून त्यांना चालान केले जात आहे. फक्त दुचाकींवर होत असलेल्या या कारवाईमुळे मात्र नागरिकांत वाहतूक विभागाप्रती रोष दिसून येत आहे.
सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण परिसरासह लगतच्या राज्यातील नागरिक आपापल्या सोयीने येथील बाजारात लग्नाच्या खरेदीसाठी येत आहेत. यामुळेच रविवारी सुटीच्या दिवशीही बाजार गर्दीने फुगून गेल्याचे दिसून येत असून बाजारपेठ खुली आहे. खरेदीसाठी येणाऱ्यांमधील सगळ््यांकडेच चारचाकी वाहने नसल्याने बहुतांश नागरिक दुचाकीने बाजारात खरेदीसाठी येत आहेत. यामुळे आपले वाहन दुकानांसमोर रस्त्याच्या कडेला लाऊनच ते दुकानात शिरतात.
बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे अर्थातच वाहनांची संख्याही वाढली बाजारात गर्दी होत आहे. नेमकी ही बाब हेरून वाहतूक पोलिसांना कारवाईची संधी मिळत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर रस्त्यावर उभ्या दुचाकींना थेट वाहनात टाकून उचलून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. कित्येकदा तर वाहनमालक दुकनांत खरेदीत व्यस्त असताना त्यांचे वाहन उचलून नेले जात असल्याने बाहेर आल्यावर मात्र वाहन न दिसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. वाहतूक विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रथम कर्तव्य आहे. येथे मात्र उलटच कारभार सुरू आहे. वाहतूक व्यवस्थेच्या नावावर मात्र सरळ वाहने उचलून नेण्याचा व नंतर चालान फाडण्याचे प्रकार केले जात आहेत. बाजारातील हा प्रकार तर सोडाच मात्र शहरातील मुख्य चौकांतही दुचाकींना अडवून त्यांचे चालान फाडले जात असल्याचे चित्र हमखास बघावयास मिळत आहेत. दुचाकींचे कागद तपासले जात आहेत. मात्र चारचाकीची तपासणी करतानाचे चित्र दुर्लभ झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
चारचाकीवाल्यांना अभय
वाहतूक पोलिसांनी दुचाकींना टार्गेट करून ठेवल्याचे दिसून येत आहे. चारचाकी वाहन रस्त्यावर सर्रास उभे राहतात. त्यांच्यामुळेच वाहतूकीला जास्त त्रास होतो ही वास्तवीकता आहे. मात्र असे असतानाही त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही. चारचाकी वाहन उभे असताना कुणी तिकडे फिरकूनही बघत नसल्याचे दररोजचे चित्र आहे. यातून नियम फक्त दुचाकींसाठीच असून चारचाकीवाल्यांना अभय दिले जात असल्याचे नागरिक बोलत आहेत.
नागरिकांसोबत अरेरावीची वागणूक
बाजारात वाहने उचलून नेण्यासाठी वाहतूक विभागाने टाटा एस वाहन भाड्यावर घेतले आहे. यात वाहने उचलण्यासाठी मुले, वाहन चालक व एक वाहतूक पोलीस असतो. वाहनातील ही मुले व पोलीस कर्मचारी मात्र वाहन मालकांसोबत अरेरावीची वागणूक करीत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत. दुचाकींना उचलून नेण्यातच ते धन्यता मानत आहेत. मात्र चारचाकीवाल्याशी कधी वाद घालताना एखादाही दिसून येत नाही.