कामगार संघटनांचा २ सप्टेंबरला संप
By Admin | Updated: August 25, 2016 00:19 IST2016-08-25T00:19:18+5:302016-08-25T00:19:18+5:30
रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्था यात अमर्याद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा व कामगार

कामगार संघटनांचा २ सप्टेंबरला संप
गोंदिया : रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्था यात अमर्याद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा व कामगार कायद्यात बदल करण्याच्या नावाखाली कामगार कर्मचारी वर्गाचे हक्क हिरावून घेण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. नवीन अंशदायी पेंशन योजनेची रक्कम भांडवलदारांच्या तिजोरीत जमा होणार आहे. सरकारने संघटनांसह संवाद साधणेही बंद केले आहे. त्यामुळे देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येवून २ सप्टेंबर २०१६ रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
केंद्र व राज्य शासनामध्ये नवीन रालोआ सरकार येवून दोन वर्षे लोटली. परंतु पूर्वीच्याच सरकारची धोरणे सध्याचे सरकार पुढे नेत आहे. भांडवलदारांना पोषक व मालकधार्जिने कायदे करण्यात येत आहेत. अंशदायी नवीन पेंशन योजना रद्द करा, सातवा वेतन आयोग सुधारणेसह १ जानेवारी २०१६ पासून लागू करा, १ जानेवारी २०१६ पासून सहा टक्के महागाई भत्ता द्या, खासगीकरण रद्द करा, रिक्त पदे त्वरित भरा, शिवाय शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय भत्ता, हॉस्टेल भत्ता, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्ती वय ६० वर्षे करणे आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनातील १९ लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक या संपात सहभागी होतील, असा निर्णय राज्य समन्वय समितीने घेतला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास चुटे २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय अर्जुनी-मोरगाव, २ वाजता सडक-अर्जुनी, ४ वाजता गोरेगाव, २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता देवरी, २ वाजता सालेकसा, ४ वाजता आमगाव, २९ आॅगस्ट रोजी ११.३० वाजता तिरोडा व २ वाजता गोंदिया येथील सभेस ते मार्गदर्शन करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणिस लिलाधर पाथोडे यांनी कळविले आहे.