सहा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप
By Admin | Updated: November 18, 2015 01:57 IST2015-11-18T01:57:14+5:302015-11-18T01:57:14+5:30
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील कृषी विभाग विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.

सहा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप
राष्ट्रीय कृषी विकास योजना : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात लाखांचे धनादेश वितरित
बोंडगावदेवी : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील कृषी विभाग विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. अर्जुनी-मोरगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुक्यातील गावपातळीवरच्या सामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१४-१५ अंतर्गत तालुक्यातील २ महिलांसह सहा शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे, त्यांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्याची पहाट उजळावी, कर्जाच्या बोज्यातून मुक्तता व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यशासन विविध योजना पॅकेज जाहीर करते. आदिवासी तालुका अर्जुनी-मोरगाव विकासापासून कोसो दूर राहत असल्याचे दिसत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नाने कृषी विभागाच्या विविध लोकोपयोगी योजना तालुक्यातील शेवटच्या टोकासह गावखेड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविल्या जातात.
शेतकरी धानाव्यतिरिक्त इतर नगदी उत्पादन देणारी पिके घेण्यासाठी पुढे आल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर कृषी अवजारे सहजरित्या उपलब्ध करून देऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
कृषी उत्पादनात भरघोष वाढ होण्याच्या हेतूने तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना थेट लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरून दिसत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर घेण्यासाठी महिला शेतकऱ्यांंना १.२५ लाख तर पुरूष शेतकऱ्यांंना एक लाखाचे अनुदान ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दिला जातो. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला १० ट्रॅक्टरचे उद्ष्टि होते.
तालुक्यातील सात शेतकऱ्यांच्या प्रस्तावांचे आठ लाखांचे धनादेश महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ लि. नागपूरला देण्यात आले. त्या अनुषंगाने तालुक्यातील कमला श्रीधर लंजे, मंगला जयदेव कापगते, अशोक लंजे, शामराव मस्के, भागवत लंजे, भीमसेन डोंगरवार या शेतकऱ्यांना साकोली येथून आयसर ३३३ ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक बी.टी. राऊत तसेच लाभार्थी शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित शेतकऱ्यांंना येत्या काही दिवसांत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात येणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले आहे. (वार्ताहर)