ट्रॅकिंग सिस्टीमने प्रवाशांना कळणार गाडीचे ‘लाइव्ह लोकेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:38+5:302021-07-07T04:35:38+5:30
गोंदिया : आजचे युग स्पर्धेचे युग असल्याचे म्हटले जात असून, त्यानुसार लोकांचे जीवन घडाळाच्या काट्यावर धावत आहे. अशात कामानिमित्त ...

ट्रॅकिंग सिस्टीमने प्रवाशांना कळणार गाडीचे ‘लाइव्ह लोकेशन’
गोंदिया : आजचे युग स्पर्धेचे युग असल्याचे म्हटले जात असून, त्यानुसार लोकांचे जीवन घडाळाच्या काट्यावर धावत आहे. अशात कामानिमित्त सतत प्रवास करणाऱ्यांना गाडीच्या वेळेनुसार आपले काम आटोपते घ्यावे लागते. यात रेल्वेच्या संकेतस्थळावरून आता गाडी कोठपर्यंत आली आहे, हे कळून जाते व प्रवाशांना आपले नियोजन करता येते. मात्र, बसने प्रवास करणाऱ्यांना स्थानकावर जाऊन बसची वाट बघत बसावे लागते. आता मात्र त्यांची ही गैरसोय थांबणार असून, रेल्वेच्या धर्तीवर बसचेही लोकेशन त्यांना आपल्या मोबाइलवर बघता येणार आहे. यासाठी राज्य रस्ते परिवहन महामंडळाने आता आपल्या बसमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम लावले आहे. या सिस्टीममुळे प्रवाशांना आता गाडीसाठी धावत-पळत स्थानकावर येण्याची किंवा स्थानकावर आल्यावर गाडी कधी येणार याची वाट बघत आपला वेळ घालविण्याची गरज पडणार नाही, हे विशेष.
------------------------
गाडीची स्पीड व लोकेशनही कळणार
ट्रॅकिंग सिस्टीमअंतर्गत संबंधित आगाराला कॉम्प्युटरमध्ये गाड्यांची काय स्थिती हे दिसून येते. यात एखादा चालक-वाहक एखाद्या ठिकाणी गाडी थांबवून वेळ घालवीत असेल तर कॉम्प्युटरमध्येही दिसेल, तसेच एखादा चालक चुकीच्या पद्धतीने, स्पीडने गाडी चालवीत असल्यास त्याचा ‘बीप’ कॉम्प्युटरमध्ये वाजतो. शिवाय गाडी कोठे आहे व त्यानुसार किती वेळात गाडी स्थानकात येणार, याबाबत संपूर्ण काही स्थिती दिसून येते.
-----------------------------
बसस्थानकात लागले २ स्क्रीन
प्रवाशांना गाड्यांची स्थिती बघता यावी यासाठी २ वर्षांपूर्वीच येथील आगारातील ८१ गाड्यांना हे ट्रॅकिंग सिस्टीम लावण्यात आले आहे, तसेच यासाठी स्थानकात २ स्क्रीन लावण्यात आले असून, त्यावरून प्रवाशांना त्यांना हवी असलेली गाडी कोठे आहे व ती किती वेळात येणार, याची स्थिती जाणून घेता येणार आहे. म्हणजेच, प्रवाशांना आता धावपळ करण्याची, तसेच गाडीसाठी स्थानकावर ताटकळत बसून राहण्याची गरज पडणार नाही. रेल्वेच्या धर्तीवर आता राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ही सुविधा सुरू केली आहे.
-------------------------
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
कित्येकदा चालक-वाहकांकडून एखाद्या ठिकाणी गाडी थांबवून टाइमपास केल्यास गाडी पुढील गंतव्यास पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे त्या गाडीचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडते. याचा फटका प्रवाशांना बसत असून, एसटीच्या सेवेला घेऊन त्यांच्यात रोष निर्माण होतो. मात्,र ट्रॅकिंग सिस्टीममुळे चालकांच्या या निष्काळजीपणावर चाप बसणार आहे. एखादी गाडी कुठे जास्त वेळ उभी असल्यास त्याबाबत स्थानकातील कॉम्प्युटरवर दिसून येणार आहे.
-------------------------
कोट
प्रवाशांना गाडी कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीममुळे सोय होणार आहे. शिवाय चालक-वाहकांच्या निष्काळजीपणावर चाप बसणार असून, सेवेत सुसूत्रता येणार आहे. प्रवासी सुविधेच्या दृष्टीने हा प्रयोग अतिशय चांगला आहे.
- संजन पटले, आगारप्रमुख, गोंदिया