पर्यटकांच्या गर्दीने व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल
By Admin | Updated: November 17, 2015 03:40 IST2015-11-17T03:40:50+5:302015-11-17T03:40:50+5:30
दिवाळीच्या सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी सध्या नागरिकांचा कल निसर्गाच्या सान्निध्याकडे वळल्याचे दिसून येत

पर्यटकांच्या गर्दीने व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल
कपिल केकत ल्ल गोंदिया
दिवाळीच्या सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी सध्या नागरिकांचा कल निसर्गाच्या सान्निध्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. कारण जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांनी हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्पात जाण्यासाठी असलेल्या सर्वच गेट्सचा कोटा सध्या फुल्ल झालेला आहे. विशेष म्हणजे येत्या आठवड्यासाठीही गेटवरून बुकिंग झाल्याची माहिती आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी एवढे आहे. विशेष म्हणजे वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे.
व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट कॉंक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सान्निध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असतानाच शासकीय कार्यालयांना सुट्या होत्याच. दिवाळी असल्याने नातेवाईकांचीही घरी गर्दी असून त्यांनाही सुट्टीचा आनंद लाभावा या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नागरिक जंगल सफारीला पसंती देत असून त्यामुळेच सध्या व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात जाण्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात १० प्रवेश गेट देण्यात आले आहेत. या सर्व गेट्सवर वाहनांना प्रवेश देण्यासाठी विशेष कोटा ठरवून देण्यात आला आहे. येथे आश्चर्याची बाब म्हणजे ७ नोव्हेंबरपासून या सर्व गेट्सचा कोटा फुल्ल झाला आहे. तर येत्या २१ तारखेपर्यंत हीच स्थिती असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून मिळाली आहे.
यातून नागरिकांना इतरत्र जाण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात सुटीचा आनंद लुटण्यात जास्त मजा येत असल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच पर्यटकांच्या गर्दीने सर्व गेट्सचा कोटा फुल्ल असून व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे.
नवेगाव अभयारण्यात पर्यटकांची गर्दी
४नवेगाव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानाचा व्याघ्र राखीव क्षेत्रात समावेश असल्याने वनराजांचा वावर तेथे वाढला आहे. येथे वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांचा कल सध्या नवेगावकडेही वाढल्याचे दिसून येत असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून मिळाली. व्याघ्र प्रकल्पात वाघोबाचे दर्शन म्हणजे नशिबाचीच गोष्ट आहे. मात्र नवेगावमध्ये वाघोबा दिसत असल्याने पर्यटक येथे गर्दी करू लागले असल्याचेही यामागचे कारण आहे. विशेष म्हणजे पितांबरोटाला गेट सध्या बंद असून जांभळी गेटवरून पर्यटकांची एंट्री सुरू आहे.
व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. मात्र कित्येकांना परत जावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी आॅनलाईन बुकिंग करूनच पर्यटनासाठी जावे, जेणेकरून त्यांचा हिरमोड होणार नाही. यासाठी ६६६. ेंँंीूङ्म३ङ्म४१्र२े.ॅङ्म५.्रल्ल या संकेत स्थळावरून बुकिंग करावी. तसेच राखीव क्षेत्रात वन्यजीव विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे अवश्य पालन करावे.
- एस.एस.कातोरे
विभागीय वन अधिकारी
वन्यजीव, गोंदिया