पर्यटन विकासाला चालना मिळेल
By Admin | Updated: January 31, 2015 01:45 IST2015-01-31T01:45:29+5:302015-01-31T01:45:29+5:30
गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. अनेक पर्यटन व तीर्थस्थळे जिल्ह्यात आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी ...

पर्यटन विकासाला चालना मिळेल
गोंदिया : गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. अनेक पर्यटन व तीर्थस्थळे जिल्ह्यात आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलक महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटन विकासाला या फलकांमुळे निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
सौंदडजवळील राष्ट्रीय महामार्गालगतच्या बोपाबोडी मार्गावर जिल्हा पर्यटन समितीने जिल्हा माहिती कार्यालयाला दिलेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या पहिल्या रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा नियोजन अधिकारी बी.एस. घाटे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. राजेंद्र जैन, उपविभागीय अधिकारी डी.एन. सोनवणे, सडक अर्जुनीचे तहसीलदार एन.जे. उईके, वन्यजीव विभागाचे सहायक वनरक्षक खंडाते, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अश्वीन ठक्कर, समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, वुई दि एलीमेंटसचे संचालक आशिष उके उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जास्तीत जास्त संख्येत पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राला भेटी देणार असल्यामुळे अनेकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राची सचित्र माहिती असलेल्या घडिपुस्तिका, पॉकेट बूक व कॅलेंडर्सची पाहणी करून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकावर जिल्ह्यातील प्रतापगड, इटियाडोह, धासगड, तिबेटीयन शरणार्थी शिबिर गोठणगाव, नवेगाव -नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, चुलबंद प्रकल्प, हाजराफॉल, बोदलकसा प्रकल्प, मांडोदेवी, कचारगड गुफा, पांगडी जलाशय, शिवमंदिर नागरा, कामठा आश्रम, परसवाडा आदी पर्यटन व तीर्थक्षेत्राचा स्थळदर्शन नकाशा किलोमिटर अंतरासह दर्शविला आहे. नवेगावबांध, कचारगड, इटियाडोह, नागझिरा आणि दुर्मिळ सारस पक्ष्यांचे अस्तीत्व असलेले परसवाडा हे ठिकाण फोटोसह दाखविण्यात आले आहे. विशेषत: रात्रीला महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचे लाईट रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलकावर पडल्यानंतर हा फलक अधिक आकर्षक दिसेल.
जिल्ह्यात हे फलक गोंदिया- बालाघाट रस्त्यावरील कोरणी फाटा येथे, देवरी-राजनांदगाव राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर ग्रामपंचायत जवळ, कोहमारा-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील दुध डेअरी जवळ, गोंदिया-तिरोडा सीमेवर, गडचिरोली -गोंदिया सीमेवर गौरनगर येथे, इटियाडोह येथे, नवेगावबांध येथे, सानगडी-नवेगावबांध सीमेवर आणि नागपूर येथे सुद्धा हे फलक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त पर्यटन व तिर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी येतील. (जिल्हा प्रतिनिधी)