तलाठ्यांच्या १७ पदांसाठी तब्बल २ हजार २७७ स्पर्धक
By Admin | Updated: September 16, 2015 02:24 IST2015-09-16T02:24:31+5:302015-09-16T02:24:31+5:30
जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने सरळ सेवा भरती अंतर्गत तलाठी पदाच्या १७ जागांकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

तलाठ्यांच्या १७ पदांसाठी तब्बल २ हजार २७७ स्पर्धक
गोंदिया : जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने सरळ सेवा भरती अंतर्गत तलाठी पदाच्या १७ जागांकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांपैकी २ हजार ९२२ उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. दरम्यान, रविवार (दि.१३) रोजी शहरातील ११ केंद्रांवरून दोन हजार २७७ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ६४५ उमेदवार गैरहजर होते.
विशेष म्हणजे शनिवारी १२ सप्टेंबर रोजी पोळा सण होता. तसेच ऐन परीक्षेच्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी मारबदीचा सण साजरा केला जातो. असे असतानाही विविध परीक्षा केंद्रांवरून तब्बल २ हजार २७७ स्पर्धकांनी परीक्षा दिली. तसेच त्वरित दुसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिकांची उत्तरतालिकासुद्धा इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळू शकतात याची पडताळणी करणे उमेदवारांना शक्य झाले आहे.
जिल्ह्यातील तलाठी पदाच्या १७ जागांकरिता २५ आॅगस्ट रोजी जाहिरात प्रकाशित करून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेसाठी २ हजार ९२२ परीक्षार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले होते.
तसेच अर्जांमध्ये त्रुटी असलेल्या १०८ उमेदवारांना अर्जातील त्रुट्या दूर करण्यासाठी वेळही देण्यात आले होते. यानंतर परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवारी १३ सप्टेंबर रोजी शहरातील एकूण ११ परीक्षा केंद्रांत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान परीक्षा घेण्यात आली.
यात आदर्श सिंधी विद्यालय, एस.एस. गर्ल्स कॉलेज, नमाद महाविद्यालय, मनोहर म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी शाळा, गुजराती नॅशनल शाळा, राजस्थान कन्या विद्यालय, जे.एम. हायस्कूल, सरस्वती महिला विद्यालय, डी.बी. सायंस कॉलेज व रविंद्रनाथ टागोर हायस्कूलचा समावेश आहे.
सर्वच परीक्षा केंद्रांवर शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक केंद्रात केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुखांची उपस्थिती होती. सदर परीक्षा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्यात आली असून चित्रीकरणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
विविध आरक्षणानुसार तलाठी पदांची संख्या
अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा असून यापैकी दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त (महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्प व भूकंपग्रस्त, खेळाडू व अपंग वगळून) आहेत. वि.जा.अ.साठी एकूण दोन जागा असून समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक आहे. भ.ज. (क) साठी एकूण दोन जागा असून त्या दोन्ही समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहेत. भ.ज. (ड) साठी एकूण एक जागा असून तीसुद्धा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे. ओबीसींसाठी एकूण चार जागा असून केवळ एक जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे. तर खुल्या गटासाठी एकूण चार जागा असून सर्वच समांतर आरक्षणाच्या असून यात समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एकही जागा नाही.