प्रेतांनाही भोगाव्या लागतात यातना
By Admin | Updated: September 29, 2014 00:47 IST2014-09-29T00:47:31+5:302014-09-29T00:47:31+5:30
‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन

प्रेतांनाही भोगाव्या लागतात यातना
केशोरी : ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन जाताना प्रेताला मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याची प्रचिती या रस्त्याकडे पाहून आल्याशिवाय राहात नाही.
ग्राम पंचायतीच्या कुंभकर्णी झोपाळू वृत्तीमुळे आणि दुर्लक्षित धोरणामुळे बोंडगाव (सुरबन) येथील स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की, पावसाळ्याच्या दिवसात त्या रस्त्यावरून साधे चालणेसुद्धा तारेवरची कसरत आहे.
वास्तविक संबंधित ग्रामपंचायतीने रस्ते विकास योजनेंतर्गत गावाला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत माती टाकून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. तेव्हापासून त्या रस्त्यावर साधा मुरुम टाकण्याचे सौजन्य देखील ग्रामपंचायतीने दाखविले नाही. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरापर्यंत पाय रुजतील असा चिखल असतो. त्यामुळे पायी चालणे सुद्धा कठीण होत असते. निधन झालेल्या व्यक्तिला जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडीवर घेऊन जातात तेव्हा तिरडी धरणाऱ्या चार व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. आपण पाय कुठे ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. जिथे पाय पडतो तिथे तो फसल्या जातो. तिरडीवरुन प्रेत पडेल की काय अशी भीती तिरडी घेऊन चालणाऱ्या व्यक्तींच्या मनात असते.
सरणासाठी लाकडे घेऊन जाणाऱ्या बैलबंडी मोडून तिथेच लागडे ठेवण्याचे प्रसंग अनेकदा ऐकण्यात आले आहेत. डोक्यावर व हाताने लाकडे नेवून सरण रचावे लागत असल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याच्या कठीण परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारासाठी जाणे कित्येक लोक टाळत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मनाचा अधिक अंत न पाहता सदर स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)