आज वाजणार शाळेचा पहिला टोला
By Admin | Updated: June 26, 2015 01:44 IST2015-06-26T01:44:49+5:302015-06-26T01:44:49+5:30
यावर्षीच्या नवीन शालेय सत्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२६) होणार आहे.

आज वाजणार शाळेचा पहिला टोला
गोंदिया : यावर्षीच्या नवीन शालेय सत्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२६) होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वागतोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षीनुसार यंदाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांत प्रवेशोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोबतच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला असून काही शाळांत गणवेश वाटपही केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा दरवर्षी २६ जून रोजी सुरू होतात. शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी खास असावा व त्यांच्यात शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून सर्व शाळास्तरावर प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार यंदाही जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे त्या माध्यमातून स्वागत केले जाणार आहे.
एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. त्यातच आता येत्या ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शासनाने राबविण्याचे ठरविले आहे.
अवघ्या राज्यात हा कार्यक्रम राबवून एकही बाळ शाळेत जाण्यापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या व्यतिरीक्त मुलांना शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके व गणवेश दिले जात आहेत. शिवाय मध्यान्ह भोजनाची योजना राबविली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
असे होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्ह्यातील सर्व शाळेत शुक्रवारी प्रवेशोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रवेशोत्सवांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवकांसह गावकऱ्यांना सहभागी करून घेऊन गावातून प्रवेश दिंडी काढली जाणार आहे. त्यानंतर शाळेत पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व काही शाळांमध्ये गणवेशही दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थाचा खास मेन्यू राहणार आहे.
गणवेश वाटप वांद्यातच
शिक्षण विभागाने यंदा ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी मागितला होता. हा निधी विभागाला २२ जून रोजी प्राप्त झाला. तो शुक्रवारी (दि.२६) तालुक्यांना वितरीत केला जाणार आहे. नंतर सोमवारपर्यंत (दि.२९) तो निधी शाळांना वितरीत होणार आहे. असे असतानाही विभागाकडून सर्व शाळांना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र निधीच येण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी गणवेश कसे घेणार असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. एकंदर पहिल्या दिवशी गणवेश वाटप वांद्यातच आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही शाळा गणवेश वाटप करणार असल्याचा अंदाज सर्वशिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी व्यक्त केला.