शिवतीर्थांवर आज उसळणार गर्दी
By Admin | Updated: February 24, 2017 01:47 IST2017-02-24T01:47:14+5:302017-02-24T01:47:14+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड पहाडावरील शिवरात्रीची यात्रा सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.

शिवतीर्थांवर आज उसळणार गर्दी
सामाजिक एकात्मतेचे प्रतीक प्रतापगड पहाडी
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड पहाडावरील शिवरात्रीची यात्रा सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. महादेव मंदिर तथा ख्वाजा उस्मान गनी चिस्तीचा दर्गा या ठिकाणी आहे. हिंदू-मुस्लीमधर्मीय भाविक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त येथे अलोट गर्दी करतील.
या पहाडीचा शेकडो वर्षे जुना इतिहास आहे. वर्षभर येथे भाविकांची ये-जा असते. महाशिवरात्रीनिमित्त तर दूरवरून लाखो श्रद्धाळूंची मोठी गर्दी येथे पहावयास मिळते. हर हर महादेव असा गजर संपूर्ण वातावरणात गुंजत असतो. एकाच पहाडीवर हिंदू-मुस्लीम दोन्ही श्रद्धाळू भाविक मोठ्या भक्तीभावाने येत असताना कोणताही वाद-तंटा येथे होत नाही हे एक वैशिष्ट्य आहे.
या राष्ट्रीय व सामाजिक एकात्मतेच्या पहाडीवर दुर्गम क्षेत्रात मागील ४०० वर्षांपूर्वी गोंड राजाच्या शासनकाळात त्यांनी किल्ला तयार केला. दगडांच्या चट्टाणांना तोडून सुरक्षेच्या दृष्टीने या प्रतापगड पहाडीची निर्मिती करण्यात आली येथील गोंड राजांवर रघुजी राजा भोसले यांची आक्रमण करून विजय मिळविला होता. नंतर त्यांच्या देखरेखीची जबाबदारी राजाखान यांना सोपविण्यात आली होती.
या पहाडीवर ख्वाजा उस्मान गनी यांची दर्गा तथा वर टोकावर चांदसावली यांचा चिल्ला दिसतो. त्याच्याजवळ विशाल गुहा तथा सुरंगद्वारे भूमिगत रस्ता दिसतो. दगडांवर नक्षीकाम, किल्ल्याच्या आत विहीर, दगडांनी बनलेली कावड जिला ‘राक्षसांची कावड’ म्हणून ओळखले जाते, त्यात हजारो भाविक एकेक करून आपला प्रवास पूर्ण करतात. मोठ्या दगडांच्या मध्ये शिवलिंग, धान कुटार, तलाव, घोड्यांच्या टापा दिसून येतात.
महादेव मंदिरात सीता नहानी, शिवमूर्ती, भवानी मंदिर व अनेक स्थळ दिसतात. येथे महाप्रसाद वितरित केला जातो. पहाडाच्या खाली खट-खटिया शाहाबाबा यांचा दर्गा व पुरातन अशोकस्तंभ आहे. अनेक भाविकांनी येथे वाघ येत असल्याची पुष्टी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी तीन दिवस दोन लाखापेक्षा जास्त भाविक हजेरी लावतात. (प्रतिनिधी)
विविध कार्यक्रम व मान्यवरांची उपस्थिती
यावर्षी प्रतापगड पहाडावर प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.परिणय फुके, वर्षा पटेल, माजी आ.राजेंद्र जैन, हाजी मजीद शोला, हाजी दाऊद शेख, कमिटीचे अध्यक्ष सत्तार रजवी, इसूफ कुरेशी आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शनिवारी (दि.२५) सकाळी ७ वाजता कुरान खानी, १० वाजता परचम कुशाई, दुपारी ३ वाजता शाही संदल, रात्री ९ वाजता महफिले समा, रविवारी (दि.२६) संदल दरबार, रात्री ९ वाजता कव्वाली, तर सोमवारी सकाळी इतर धार्मिक कार्यक्रम राहणार आहे. उर्समध्ये तिन्ही दिवस लंगर राहणार आहे.