तिरोडा रेल्वे स्थानक अत्याधुनिक करा

By Admin | Updated: April 21, 2017 01:28 IST2017-04-21T01:28:19+5:302017-04-21T01:28:19+5:30

‘पॉवर सिटी’ म्हणून नावारूपास आलेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्थानक अजूनही सुविधा आणि विकासाच्या बाबतीत मागासलेले आहे.

Tiroda railway station will be sophisticated | तिरोडा रेल्वे स्थानक अत्याधुनिक करा

तिरोडा रेल्वे स्थानक अत्याधुनिक करा

देवानंद शहारे   गोंदिया
‘पॉवर सिटी’ म्हणून नावारूपास आलेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्थानक अजूनही सुविधा आणि विकासाच्या बाबतीत मागासलेले आहे. अदानी पॉवरसारखा मेगाप्रोजेक्ट तिरोड्यात आल्यानंतर तिरोडा शहराच्या आणि तालुक्याचा विकास होईल, असे वाटत होते. मात्र तालुक्याचा विकास तर सोडा, येथील रेल्वे स्थानकही सोयीसुविधांअभावी अविकसितच आहे.
तिरोडा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अत्यल्प शेड आहे. त्यामुळे गाडीच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तीव्र उन्हाचे चटके खावे लागतात. प्लॅटफॉर्म-१ वर थोड्या-थोड्या अंतरावर लहानसे शेड देण्यात आले आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. तर प्लॅटफॉर्म-२ वर एकच शेड आहे. त्यामुळे उन्हा-पावसात प्रवाशांच्या रांगा माल गोदामापर्यंत लागतात. लांब शेडच नसल्यामुळे प्रवाशांंना मोठाच त्रास होतो.
तिरोडा रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी बेलाटी गावाच्या दिशेने बुकिंग आॅफिसजवळ जुने पूल आहे. परंतु तिरोडा शहरातून येणारे प्रवासी या पुलाचा उपयोग खूपच कमी करतात. ते सरळ मालगोदामाजवळील पायवाटेने रेल्वे मार्ग ओलांडून प्लॅटफॉर्म-१ वर जातात. तर प्लॅटफॉर्म-१ वर उतरलेले प्रवासी शहरात जाण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडून याच पायवाटेने शहराकडे जातात. या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म-१ वर असलेल्या पाणी टाकीच्या समोरच्या बाजूने सरळ तिरोडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने एका नवीन पुलाची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागतो.
प्लॅटफॉर्म-२ वर पूर्व दिशेच्या टोकाला अनेक वर्षांपासून बंद माल गोदामाजवळ झुडुपे आहेत. या माल गोदामाला चारही बाजूंनी वेढलेले झुडुपे काढण्यात यावी. ती जागा स्वच्छ करून तिथे सुंदर बगिचा तयार करण्यात आला तर स्थानकाच्या सौंदर्यात भर पडू शकेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानकाचे परिसर भकास दिसत आहे. याच माल गोदामासमोर पिंपळाच्या वृक्षाखाली अनेक दिवसांपासून बंद स्थितीत सायकल स्टँड आहे. प्लॅटफॉर्म-२ वरचे प्रवासी येथूनच फलाटावरून उडी घेवून खाली उतरतात व लहान हनुमान मंदिराजवळ असलेल्या आवारभिंतीच्या खुल्या जागेतून बाहेर पडतात. येथून पादचारी मार्ग बनविण्याची गरज असून आवारभिंतीला लागून सुंदरसे प्रवेशद्वार बनविण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या बंद सायकल स्टँडसमोर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. येथील परिसर उंच करणे गरजेचे आहे. मात्र याकडेही दुर्लक्षच केले जात आहे.
मागील सहा महिन्यांपासून गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस तिरोडा स्थानकात थांबत असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. मात्र दिल्लीकडे जाण्यासाठी गोंडवाणा गाडीच्या थांब्याची मागणी केली जात आहे. ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे.
ही मागणी पूर्ण झाली तर तिरोडावासियांना दिल्लीकडे प्रवाश करण्याची सोय होऊ शकेल. शिवाय रात्रीला गोंदियावरून तिरोडा येथे जाण्यासाठी रात्री ९ वाजताच्या इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेसनंतर दुसरी कोणतीही गाडी नाही. त्यामुळे रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान गोंदिया ते नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या एका गाडीचा थांबा तिरोडा येथे देण्याची मागणी तिरोडावासियांनी केली आहे. किंवा गोंदिया-इतवारी-गोंदिया ही मेम्यू गाडी दिवसातून दोन फेऱ्या केल्यानंतर इतवारी स्थानकात रात्रभर थांबून असते.
या गाडीची सायंकाळी तिसरी फेरी इतवारीवरून सुरू करून तिला गोंदिया स्थानकातून रात्री १० वाजतानंतर इतवारीसाठी सोडण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

अंडरग्राऊंड व उड्डाणपुलाची गरज
रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या पहिल्या रेल्वे गेटखालून अंडरग्राऊंड पूल तयार करण्यात यावे. तिरोडा शहरातील नागरिक विविध कामांसाठी याच रस्त्याने पंचायत समिती, तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र त्यांना बंद रेल्वे गेटमुळे तासनतास गेट उघडे होण्याची वाट पहावी लागते. तर तिरोडा स्थानकापासून दुसरे गेट खैरलांजी मार्गावर आहे. हा तिरोडा-बालाघाट आंतरराज्य मार्ग असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांना जोडणारा आहे. या गेटवर प्रवाशांची मोठीच वर्दळ राहत असल्याने येथे उड्डानपुलाची गरज आहे. मात्र शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Tiroda railway station will be sophisticated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.