दिवाळीच्या उत्साहावर अवकाळीचे विरजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:24+5:30
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता.

दिवाळीच्या उत्साहावर अवकाळीचे विरजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी सणाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत होती. तर दिवाळीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी(दि.२६) सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चार वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोढ होऊन त्यांच्या उत्साहावर पावासाचे विरजन पडले.
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. मात्र दुपारी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे अनेकांना खरेदी न करताच घरी परत जावे लागले. त्यामुळे त्यांचा सुध्दा हिरमोढ झाला होता.
सर्वच भागात पाऊस
जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव, सालेकसासह इतर भागात सुध्दा शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात एक ते दीड तास पाऊस झाल्याने याचा या भागातील धानपिकांना सर्वाधिक फटका बसला.
शेतकऱ्यांचे नुकसान
सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी सुरु आहे. मात्र शनिवारी झालेल्या पावसाचा फटका कापणी करुन बांध्यामध्ये ठेवलेल्या धान भिजला. बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता आहे.तर शेतामध्ये उभा असलेला धान सुध्दा पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपला. यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
यावर्षी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा बंफर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.