‘टिल्लूं’नी वाढविले टेंशन
By Admin | Updated: May 17, 2016 01:35 IST2016-05-17T01:35:09+5:302016-05-17T01:35:09+5:30
पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी

‘टिल्लूं’नी वाढविले टेंशन
गोंदिया : पाण्यासाठी हाहाकार माजला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गोंदियात अनेक वर्षानंतर एक वेळा पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मात्र कमी वेळासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पुरेसे पाणी मिळावे म्हणून अर्धेअधिक नळधारक टिल्लूपंपांनी पाणी खेचत आहेत. परिणामी अनेक जणांना, विशेषत: उंच भागातील रहिशांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण याला आळा घालण्यात हतबल दिसून येत आहे.
जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटत चालल्यामुळे पाणी टंचाईची समस्या गडद झाली आहे. आता जेमतेम मे महिना सुरू असून एक महिनातरी पाऊस जोर धरणार नाही. त्यामुळे एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा करता यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना ठरवून दिलेल्या वेळात पाणी भरून ठेवावे लागत आहे. मात्र सर्वच नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नसल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे.
याचे कारण असे की, शहरात असलेल्या नळ कनेक्शनधारकांमधील बहुतांश नळधारकांकडे आज टुल्लूपंप असून ते पंपद्वारे पाणी खेचून घेत आहेत. परिणामी ज्यांच्याकडे टुल्लूपंप नाही अशांपर्यंत पाणी पोहचू शकत नाही. यामुळे त्यांना थोडेफार पाणीच मिळत आहे. याबाबत अशा नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या प्रकारावर कारवाई शून्य दिसून येत आहे. मजीप्राच्या या भूमिकेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोरड्या घशानेच राहावे लागण्याची गत आली आहे. (शहर प्रतिनिधी)
पुरवठा काळात भारनियमन करा
४टिल्लू पंपाद्वारे पाणी खेचण्याचा हा प्रकार जोमात सुरू असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोमवारी (दि.१६) पाणी पुरवठा काळात भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी महावितरणला तसे निर्देश दिल्याची माहिती मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी दिली. मात्र महावितरण त्यावर कधी अंमलबजावणी करते यावर बरेच काही अवलंबून आहे.
४शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे १२०७४ कनेक्शनधारक आहेत. एक अंदाज लावला असता यातील अर्ध्याधीकांकडे टुल्लूपंप आहे. नळाव्दारे येत असलेल्या पाण्याला फोर्स राहत नसल्यामुळे शिवाय नळ कधी येणार नाही याचा नेम नसल्याने हे टुल्लूपंपधारक पंपलावून पाईपलाईनमधील पाणी खेचून साठवून ठेवतात. त्यांचा हा प्रकार मात्र गरिबांना पाण्यासाठी तडफडत सोडून देत आहे.
या काळात मजीप्राने शोध मोहीम राबविणे गरजेचे होते. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक भागात जाणे शक्य नाही. मात्र तक्रार आल्यावर यासंदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल. शिवाय पोलिसांतही तक्रार नोंदवून कारवाई करणार आहोत.
- राजेंद्र मडके
उपविभागीय अभियंता, मजीप्रा.