मलकाझरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
By अंकुश गुंडावार | Updated: March 28, 2025 20:04 IST2025-03-28T20:03:55+5:302025-03-28T20:04:10+5:30
वाघाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या असल्याने त्याचा पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

मलकाझरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
गोंदिया : देवरी तालुक्यातील चिचगड वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ मध्ये कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. वाघाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या असल्याने त्याचा पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
चिचगड वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ परिसरात वनरक्षक शुक्रवारी दुपारी गस्त घालत असताना एका पाणवठ्याजवळ कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला. त्यांनी लगेच याची माहिती वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांना व वन अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली.
वाघाचा मृतदेह हा पुर्णपणे कुजलेल्या होता. त्याच्या गळ्याजवळ काही खूणा आढळल्या. तसेच या वाघाला मारल्यानंतर त्याला पाचशे मीटरपर्यंत फरफटत पाणवठ्याजवळ नेण्यात आल्याची बाब परिसरातील खूणावरुन पुढे आली. एकंदरीत दोन वाघांच्या झुंझीमध्येच या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वाघाचा मृत्यू पाच सहा दिवसांपुर्वी झाला असल्याचे मृतदेहाच्या स्थितीवरुन आढळले. विशेष म्हणजे मृतदेह पुर्णपणे कुजलेला असल्याने त्याचे शवविच्छेदन सुध्दा करता आले नाही अथवा नमुने सुध्दा तपासणीसाठी घेता आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
ट्रॅप कमेऱ्यांची मदत घेणार
ज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला त्या परिसरात एखाद्या वाघाचा वावर असण्याची शक्यता आहे. त्याच वाघासह झालेल्या झुंझीत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मलकाझरी कक्ष क्रमांक ८०२ मध्ये ट्रॉप कॅमेरे लावले असून त्यांची तपासणी करुन या वाघाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येणार असल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.