व्याघ्र प्रकल्पात सहाच वाघांचे दर्शन

By Admin | Updated: May 8, 2015 01:00 IST2015-05-08T01:00:55+5:302015-05-08T01:00:55+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध बीटमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या २४ तासात करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत केवळ सहा वाघ आढळले.

Tiger View of Six Tigers | व्याघ्र प्रकल्पात सहाच वाघांचे दर्शन

व्याघ्र प्रकल्पात सहाच वाघांचे दर्शन


गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध बीटमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या २४ तासात करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत केवळ सहा वाघ आढळले. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या वाढली असली तरी काही दिवसांपूर्वी कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आढळलेल्या संख्येपेक्षा ही संख्या कमी असल्याने कोणती संख्या खरी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
४-५ मे रोजी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी २२६ मचान तयार करण्यात आले होते. जिथे पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणच्या ५० मीटरच्या आसपास हे मचान बनविण्यात आले होते. तसेच वन्यजीवांच्या गणनेत सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर व आलापल्ली येथील अशासकीय संस्थेचे सदस्य आले होते. एकूण २५४ वन्यजीव प्रेमी या अभियानात सहभागी झाले होते. यात २२३ पुरूष तर ३१ महिलांचा समावेश होता.
विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्याची संपूर्ण तयारी वन विभागाने केली होती. परंतु त्या रात्री अचानक आकाश ढग जमा झाले व त्यामुळे वन्यप्राण्यांची गणना प्रभावित झाली. शक्यतो अनेक वन्यजीव त्या रात्री जलस्त्रोतांजवळ पोहचले नाही, असे सांगितले जात आहे. जर वन्यप्राणी जलस्त्रोतांजवळ आलेही असतील तरी ढगाळलेल्या वातावरणाचा अंधार असल्यामुळे त्यांची गणना होवू शकली नाही.
यात प्रामुख्याने सहा वाघ आढळले. यातील दोन उमरझरी, एक पिटेझरी, दोन नागझिरा व एक बोंडे वनपरिक्षेत्रात आढळला. ४५ बिबटसुद्धा आढळले. २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानगवे, एक हजार ४०६ चितळ, ४४६ सांभर, ५९७ निलगाय, २० चौसिंगे, १५६ भेकर, एक हजार ४४४ रानडुक्कर, २४० मोर, २९ मुंगूस, ४४५ मॅक्यूई, चार हजार ७५६ वानर, आठ पॉरक्युपाईन, १६ रानमांजर यांचा समावेश आहे.
उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी केवळ चारच वाघ आढळले होते. यात दोन नागझिरा अभयारण्यात, एक न्यू नागझिरा अभयारण्यात व एक कोका अभयारण्यात होते. बिबट्यांची संख्या ४२ होती. ही संख्या यावर्षी वाढली. अस्वल २०१, रानगवे एक हजार २८१, सांभर ५४७, चितळ एक हजार ४११, रानडुक्कर एक हजार ३९६, लाल तोंडाचे वानर ४६२, निलगाय ५६९, मुंगूस १२, मोर ३२३, रान कुत्रे ४०५, रान मांजरी ९, चौशिंगा १८, वानर तीन हजार ८८९ आढळले होते. मागील वर्षी १४ मे रोजी झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत एकूण १० हजार ७६१ वन्यप्राणी आढळले होते. यावर्षी ही संख्या वाढून ११ हजार २७५ झाली आहे. (प्रतिनिधी)
सात बीटमध्ये वन्यप्राणी गणना
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात एकूण सात बिटमध्ये (रेंज) वन्यप्राण्यांची गणना ४-५ मे २०१५ रोजी करण्यात आली. यात कोका येथे ९२९ वन्यप्राणी, उमरझरी येथे ७८०, पिटेझरी येथे एक हजार ४१७, नागझिरा येथे चार हजार ७८१, नवेगाव राष्ट्रीय उद्यानात दोन हजार ४०५, डोंगरगाव येथे ५४३ व बोंडे येथे ४२० अशी एकूण ११ हजार २७५ वन्यप्राण्यांची नोंद बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन कर्मचारी व वन्यजीव प्रेंमीकडून करण्यात आली.

Web Title: Tiger View of Six Tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.