विशेष रेल्वे गाडीच्या माध्यमाने तिकीट तपासणी
By Admin | Updated: November 27, 2015 02:10 IST2015-11-27T02:10:59+5:302015-11-27T02:10:59+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनात नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाद्वारे ...

विशेष रेल्वे गाडीच्या माध्यमाने तिकीट तपासणी
विनातिकीट प्रवासाची ८,२३२ प्रकरणे : रेल्वेने केली २१ लाख २८ हजार रूपयांची वसुली
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनात नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाद्वारे विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे.
यात विनातिकीट, अनियमित प्रवासी तसेच सामान बुक न करता लगेज प्रकरणांसह अनधिकृत सामान विक्रेत्यांवर आवर घालण्यासाठी मंडळातून जाणाऱ्या प्रवाशी गाड्या तसेच लहान व मोठ्या लाईनवरील स्थानकांवर विशेष तिकीट चेकींग अभियान राबविण्यात येत आहे.
याच क्रमात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विपिन वैष्णव व ओ.पी. जायस्वाल यांच्या पुढाकारात २३ तिकीट तपासणी कर्मचारी व १८ सुरक्षा दलाचे जवान यांच्या सहकार्याने एका विशेष रेल्वे गाडीच्या मध्यमाने २० नोव्हेंबर रोजी नागपूर-गोंदिया-नागभिड-बल्लारशाह दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यानंतरही हे अभियान सुरूच आहे. या विशेष तपासणीदरम्यान १८७ विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे पकडण्यात आली. यात रेल्वे प्रशासनाने एकूण ३४ हजार ४३५ रूपयांची वसुली केली.
तसेच अनधिकृत पद्धतीने कचरा फेकण्याचे तीन प्रकरणे पकडण्यात आले. यात १५० रूपये वसूल करण्यात आले. याशिवाय अतिरिक्त रेल्वे अधिनियमाच्या कलम १४४ (अनधिकृत वेंडर) अंतर्गत सात व्यक्तींना व कलम १६२ (अनधिकृतपणे महिला डब्यात प्रवास) अंतर्गत दोन प्रवाशांना नागभिड रेल्वे स्थानकात रेल्वे न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले. यात क्रमश: चार हजार ९०० रूपये व ४०० रूपयांचा दंड सुनावण्यात आला.
मंडळाद्वारे १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत मंडळातील वाणिज्य अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या एकूण ४६ विशेष तिकीट तपासणी अभियानात एकूण आठ हजार २३२ विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले. याद्वारे रेल्वे प्रशासनाला एकूण २१ लाख २८ हजार ७६३ रूपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय अनधिकृत पद्धतीने कचरा फेकणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करून ९४ प्रवाशांकडून सात हजार ७३० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. सदर विशेष रेल्वे तिकीट तपासणी अभियान पुढे निरंतर सुरु राहणार आहे. प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करावे व योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावे अन्यता त्यांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागू शकेल, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)