गुरुवार ठरणार ‘साहित्य वापर दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:29 PM2019-08-21T23:29:27+5:302019-08-21T23:31:00+5:30

अनेक शाळांमध्ये साहित्य पेट्या अजूनही कुलूप बंद आहेत. बहुतांश शाळांमध्ये साहित्यपेट्या वर्गात किंवा कार्यालयात पडून आहेत. शिक्षक या साहित्यांचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक शिक्षकांना साहित्यांची नावे ही माहिती नाहीत. ते साहित्य कसे वापरायचे व विद्यार्थ्यांना हाताळायला कसे द्यायचे हे काही शिक्षकांना माहिती नाही.

Thursday is 'Material Usage Day' | गुरुवार ठरणार ‘साहित्य वापर दिवस’

गुरुवार ठरणार ‘साहित्य वापर दिवस’

Next
ठळक मुद्दे२९ आॅगस्टपासून प्रारंभ : अनेक शाळांमध्ये साहित्यपेट्या अजूनही कुलूप बंद

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अनेक शाळांमध्ये साहित्य पेट्या अजूनही कुलूप बंद आहेत. बहुतांश शाळांमध्ये साहित्यपेट्या वर्गात किंवा कार्यालयात पडून आहेत. शिक्षक या साहित्यांचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक शिक्षकांना साहित्यांची नावे ही माहिती नाहीत. ते साहित्य कसे वापरायचे व विद्यार्थ्यांना हाताळायला कसे द्यायचे हे काही शिक्षकांना माहिती नाही. हे साहित्य वापरले जावेत यासाठी प्रत्येक गुरूवार हा आता ‘साहित्य वापर दिवस’ म्हणून २९ आॅगस्ट पासून सुरू केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात शाळा व शाळेतील शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक खेळ व साहित्याच्या माध्यमातून अध्ययन अनुभव दिल्याने त्यांच्यात शाळेत येण्याची गोडी निर्माण होते. याकरिता महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना गणित, भाषा व इंग्रजी साहित्य पेटी उपलब्ध करुन दिली आहे.
या साहित्य पेटीत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्य घटकांवर आधारित अनेक साहित्य आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांच्या शाळा भेटी घेतल्या असता, असे लक्षात आले की अनेक शाळांमध्ये या साहित्य पेट्या आहेत. परंतु अजूनही कुलूप बंद आहेत.
या साहित्य पेटीतील साहित्यांचा सर्व शाळेतील शिक्षकांनी वापर करुन अध्ययन-अध्यापन करण्याच्या हेतूने २९ आॅगस्ट पासून ‘साहित्य वापर दिन’ म्हणून जिल्ह्यात सुरु केला जात आहे. यांतर्गत, प्रत्येक गुरुवारी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील (सीबीएसई व आयसीएसई बोर्ड शाळा गवळून) शिक्षकांनी आपापल्या वर्गात नियोजित तासिकेत साहित्यांच्या मदतीने वर्ग अध्यापन करुन ‘साहित्य वापर दिन’ साजरा करायचा आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी झुम मिटींगच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
वापर होतो किंवा नाही याची, होणार पाहणी
सदर उपक्रम २९ आॅगस्टसाठी मर्यादित नसून दर गुरुवारी सर्व तासिकांकरिता नियमित सुरु ठेवला जाणार आहे. पर्यवेक्षकीय अधिकारी जर या दिवशी भेटीवर असतील तर हा दिवस साहित्य पेटीतील साहित्य वापर दिन म्हणून ओळखला जाईल. भेटीदरम्यान पाहणी केली जाईल व गरजेनुसार कितीही वेळा साहित्याचा वापर करुन प्राधान्याने भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांच्या मुलांना अध्ययन अनुभव देण्यावर भर द्यावयाचा आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, साधन व्यक्ती, फिरते विशेष शिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शाळेला भेट देऊन पाहणी करुन तसा अहवाल सादर करावयाचा आहे.

अशा दिल्या मार्गदर्शक सूचना
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, साधनव्यक्ती, बीआरजी-सीआरजी सदस्य व शिक्षकांनी शाळेतील साहित्य पेटीतील साहित्याचे वर्गनिहाय वाटप झाल्याची खात्री करावी, ज्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात गणित, भाषा, इंग्रजी, विज्ञान प्रयोग साहित्य व सामाजिक शास्त्र विषयांकरिता साहित्य उपलब्ध नाही अशा शाळांनी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या मदतीने पाठ्यघटकावर स्वनिर्मित साहित्य तयार करावे, सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटी दरम्यान झुम मिटींग द्वारे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी कनेक्ट होऊन शिक्षक शिकवित असलेल्या वर्गाची लाईव्ह स्थिती दाखवायची आहे. तसेच लाईव्ह अध्ययन-अध्यापनाचे निरीक्षण करण्यात येईल, मुख्याध्यापकांनी साहित्याचा वापर करुन शिक्षक अध्यापन करीत आहे याचे फोटो जतन करुन ठेवावे तसेच किती शिक्षकांनी साहित्याचा कोणत्या विषयाकरिता व घटकांकरिता वापर केला याचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना लगेच सादर करावा.

सदर उपक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावयाची आहे. यात कुणीही हयगय करू नये, जे शिक्षक साहित्यांचा वापर करताना दिसून येणार नाही अशा सर्व शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय सहायक, साधनव्यक्ती, फिरते विशेष शिक्षक यांना देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शाळेला भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राजकुमार हिवारे
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया.

Web Title: Thursday is 'Material Usage Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.