परिसरात आवत्या पध्दतीवर जोर

By Admin | Updated: June 24, 2015 01:58 IST2015-06-24T01:58:51+5:302015-06-24T01:58:51+5:30

या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Thrust on the recurring system in the area | परिसरात आवत्या पध्दतीवर जोर

परिसरात आवत्या पध्दतीवर जोर

धानपिकांसाठी उपयोगी : जमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्या पद्धतीने पेरणी
कालीमाटी : या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमगाव तालुक्यातील अनेक गावे खरीप धान पिकावर अवलंबून असतात. दिवसेंदिवस धान पीक घेणे खर्चिक होत आहे. पिकांसाठी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधी साधन सामुग्रीचे भाव आभाळाला गवसले आहेत. तसेच मजुरांची कमतरता दिसून येत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेती करणे अवघड व परवडणारे नसल्याने शेतकरी आवत्या पध्दतीला पसंती देत आहेत.
आवत्या प्रणालीत खर्च कमी व उत्पादन समाधानकारक येतो. आवत्या म्हणजे धानाची बियाणे शेतात सिडकण्याचा प्रकार आहे. त्याकरिता संपूर्ण शेतात नागरणी करून धानाचे बियाणे फेकले जातात. त्याचबरोबर तणाचे प्रमाण वाढू नये म्हणून तणनाशक औषधींची फवारणी केली जाते. धानाचे रोपटे आल्यावर पुन्हा तण किंवा इतर कचरा आल्यास एकदा फवारणी करून युरिया किंवा इतर रासायनिक खते दिले जातात. सदर प्रक्रिया सध्या या परिसरात सुरू आहे. यामुळे धान जमिनीत लावण्याची कटकट राहत नाही व मजुरांचा प्रशन उद्भवत नाही.
सध्या परिसरात शेती लागवडीला बटईदार (जमिनी राबणारे) मिळत नाही. त्यामुळे शेत मालक स्वत: आवत्या पध्दतीचा अवलंब करून जमिनी पडीत ठेवण्यापेक्षा लागवडीखाली आणली जाते. या क्षेत्रात बहुतेक शेतकऱ्यांना मागील वर्षी आवत्या पद्धतीमुळे शेतातील उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले.
शेती कार्यासाठी दिवसेंदिवस मजूर वर्ग कमी होत आहे. ग्रामीण युवा वर्गाचे शेतीकडे कल कमी दिसून येते. काही ठिकाणी आई-वडील शेतात राबराब राबतात पण आजची तरूणाई कॅरेम व पानटपरीवर दिसून येतात. युवा वर्गात शेतीविषयी मानसिकतेचे खर्चीकरण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आजच्या पिढीच्या मानसिकतेत बदलाची भूमिका येणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात शेतजमिनी पडीत राहण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होऊन हलाकीची परिस्थिती उद्भवणार, असेही जाणकारांचे मत आहे. या समस्येकडे प्रशासन किंवा पुढारी यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
मजुरांच्या समस्येमुळे जिल्ह्यात काही प्रमाणात आवत्या पद्धतीने धानपीक घेतले जाते. याचे प्रमाण देवरी तालुक्यात अधिक असून गोंदिया तालुक्यात कमी आहे. जिल्ह्यात आवत्या लागवडीची टक्केवारी ७.४४ असून लागवडीचे क्षेत्र १४ हजार ७२ हेक्टर आहे. आवत्यांमध्ये बियाण्यांचे छिडकाव केले जाते.
-ए.एस. भोंगाडे,
तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया.
शेतीसाठी पावसाचे प्रमाण अनुकूल
आमगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण शेतीकरिता पोषक आहे. जून महिन्यात १७ तारखेला मंडळ आमगाव येथे १५.५ मिमी, कट्टीपार ११.२, ठाणा निरंक, तिगाव ३५.८ मिमी, १८ जूनला आमगाव येथे ४४.२, कट्टीपार १८.२, ठाणा २६.४, तिगाव ३५.८ मिमी या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तहसील कार्यालयात तालुक्यातील मंडलनिहाय दरदिवशी पावसाची नोंद घेतली जात आहे. तसेच नवीन शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. त्यात वीज पडून मृत्यू झाल्यास चार लाख, जखमींना उपचारासाठी १२ हजार, जनावरे दगावल्यास ३० हजार, लहान गुरांसाठी तीन हजार रुपये, घरांची पडझड झाल्यास पाच हजार आणि इतर नुकसान भरपाईत वाढ करण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी सांगितले.

Web Title: Thrust on the recurring system in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.