हातभट्ट्यांवर धाडसत्र
By Admin | Updated: July 18, 2015 01:10 IST2015-07-18T01:10:48+5:302015-07-18T01:10:48+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया कार्यालयाने अवैध हातभट्टी, मोहा दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात ...

हातभट्ट्यांवर धाडसत्र
एक्साईजची कारवाई : २.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया कार्यालयाने अवैध हातभट्टी, मोहा दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात तिरोडा तालुक्यात राबविलेल्या विशेष धाडसत्रात ९ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३ आरोपींना मुंबई दारुबंधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. या मोहिमेत एकूण ७५ लिटर हातभट्टीची दारु, १०४६० लिटर मोहा सडवा व हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी शकुंतलाबाई बिंझाडे (४५) रा. रविदास ता.तिरोडा, रंजित बाबुराव बरीयेकर (३०) रा.रविदास वार्ड, ता. तिरोडा व दिनदयाल उके (६०) रा. बोरगाव सर्रा यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंधी कायदा, १९४९ च्या कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक, दुय्यम निरिक्षक गोंदिया व देवरीचे चिटमटवार, बोडेवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हुमे व रहांगडाले, जवान ढाले, फुंडे, उईके, ढोमणे, मुनेश्वर व वाहनचालक सोनबर्से यांनी केली. राज्य उप्पादन शुल्क गोंदिया विभागाने जून महिन्यात जिल्हाभरात राबवलेल्या धाडसत्रात एकूण ७९ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४५ वारस गुन्ह्यांमध्ये ४७ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जून महिन्यात विभागाकडून ७९० लिटर हातभट्टी मोहा दारु, २९४३९ लिटर मोहा सडवा, २१९ मोहा फुले, १४० लिटर देशी दारू, ५ लिटर विदेशी दारु व ३ दुचाकी वाहने असा एकूण ७.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जास्त दराने मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
जून महिन्यात विभागाकडून जिल्ह्यातील मद्य विक्री अनुज्ञप्त्याचे (लायसन्स) अचानकपणे निरीक्षण करण्यात आले असून एमआरपीपेक्षा जास्त दराने मद्य विक्री केलेल्या २ वाईन शॉप व ५ किरकोळ देशी दारु दुकानांवर विभागीय विसंगती प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तसेच इतर नियमभंग प्रकरणी ७ मद्य अनुज्ञप्त्यांवरही विभागाने विसंगती प्रकरण नोंदविले आहे.
जिल्ह्यात अवैध दारुविरोधात धडक मोहिमा राबवून हातभट्टीची दारु तसेच बनावट दारु तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील सर्व मद्य अनुज्ञप्तीधारकांनीही अनुज्ञप्तीच्या अटी शर्तीचे पालन करावे, अन्यथा अनुज्ञप्तींवर नियमभंगाचे प्रकरण नोंदवण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोंदिया येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.