तिघांची आत्महत्या तर दोघांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: September 20, 2014 23:52 IST2014-09-20T23:52:26+5:302014-09-20T23:52:26+5:30
जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुण महिलेसह वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. यासोबतच दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एकाचा तलावात बुडाल्याने तर दुसऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.

तिघांची आत्महत्या तर दोघांचा अपघाती मृत्यू
गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुण महिलेसह वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. यासोबतच दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एकाचा तलावात बुडाल्याने तर दुसऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षापासून असलेल्या दम्याच्या आजाराला कंटाळून शुक्रवारी चुलबंद नदीच्या बोंडगाव परिसरातील पात्रात उडी घेऊन पारबता पांडुरंग बोदेले (८१) रा.बोंडगाव या वृद्ध महिलेने आत्महत्या केली. गणपत पांडुरंग बोदेले यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अदासी येथील झिनीदालसिंग पाडुंसिंग सोमवंशी (५५) या इसमाने खोकला व कानाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारच्या सायंकाळी ५.३० वाजता विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विनोदसिंग सोमवंशी (२८) रा.अदासी यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रतापगड येथील मोनिका भास्कर कचलाम (२७) या महिलेने विष प्राशन केल्यामुळे तिला उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील ख्रिश्तानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. डॉ.साईनाथ भोवते यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी सदर घटनेसनदर्भात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मालीजुंगा येथील तलावाच्या पाण्यात ४० वर्षाच्या इसमाचा मृतदेह आढळला. जनीराम शामराव मेश्राम (४०) रा. मालीजुंगा असे मृताचे नाव आहे. गुरूवारच्या सायंकाळी ५.३० वाजता तो घराबाहेर पडला. शुक्रवारच्या सायंकाळी ४.३० वाजता त्याचा मृतदेह आढळला. सुखदेव गणाजी कापगते (५२) रा. मालीजुंगा यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
पाचव्या घटनेत देवरी येथील कार्तिक मधुकर मेश्राम (२३) या तरूणाला रविवारी सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)