आर्वीत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले
By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T22:58:59+5:302014-11-06T22:58:59+5:30
जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत.

आर्वीत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले
पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याची नागरिकांची मागणी
आर्वी : जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आर्वी तालुक्यात पुन्हा नव्याने तीन रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात व्हायरल फिव्हरसह डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णाची तपासणी केली असता एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे आर्वीत दोन तर धनोडी येथे एक असे एकूण तीन रुग्ण तालुक्यात आहेत.
जिल्ह्यातच नव्हे राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. आर्वीतील साईनगर येथील एक, गणपती वॉर्डातील एक तर तालुक्यातील धनोडी येथे एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रुग्णालयात तपासणी करीता येत असलेल्यापैकी दोन ते तीन रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर येत असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली.
आर्वीतील न.प. अंतर्गत येणाऱ्या वॉर्डात या रोगाच्या पार्श्वभूमीवर नियमित साफ सफाई व रोगाबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालिकेने नाल्यांची, सांडपाण्याची स्वच्छता करावी, औषध फवारणी करण्याची मागणी येथील नागरिकांनी पालिकेडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)