जावयाच्या खून प्रकरणात आणखी तीन आरोपी
By Admin | Updated: January 30, 2016 02:10 IST2016-01-30T02:10:22+5:302016-01-30T02:10:22+5:30
गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार येथे सासऱ्याच्या घरी गेलेल्या जावयाची हत्या करण्याच्या घटनेत केवळ सासऱ्यालाच आरोपी करण्यात आले.

जावयाच्या खून प्रकरणात आणखी तीन आरोपी
आईचा आरोप : तपास दुसऱ्याकडे देण्याची मागणी
गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार येथे सासऱ्याच्या घरी गेलेल्या जावयाची हत्या करण्याच्या घटनेत केवळ सासऱ्यालाच आरोपी करण्यात आले. मात्र या घटनेत आणखी तीन आरोपींचा समावेश असून त्यांच्यावर खुनाचा व प्राणघातक हल्ला केल्याचाही गुन्हा नोंदविण्याची मागणी या घटनेतील मृताची आई इंदू देवनाथ मडावी आणि प्रत्यक्षदर्शी तथा जखमी पंकज भरत मडावी (३१) रा.गांधी वॉर्ड, गोंदिया यांनी केली आहे.
गोंदियात पत्रपरिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. गोंदियाच्या गजानन कॉलनीतील अजय देवनाथ मडावी (३०) हा आपला मावस भाऊ पंकजला घेऊन माहेरी असलेल्या पत्नीकडे २३ जानेवारीच्या रात्री ११.३० वाजता गेला. २४ जानेवारी रोजी अजयचा वाढदिवस असल्याने रात्री आपल्या मुलाला व पत्नीला भेटू म्हणून त्याने आपल्या मावस भावाला मुंडीपारला नेले होते.
सात वर्षापूर्वी गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार येथील बाबूलाल दयाराम उईके (६३) यांची मुलगी माधुरी हिच्याशी रितीरिवाजाप्रमाणे त्याचे लग्न झाले. अजयपासून माधुरीला एक सहा वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. अजय माधुरीला त्रास देत असल्याने ती सप्टेंबर २०१५ मध्ये मुलाला घेऊन माहेरी आली.
त्यांचा वाद महिला सेल मध्येही दाखल झाला होता. लग्न झाल्यापासून अजय कामधंदा करीत नसल्याने पती-पत्नीत वाद व्हायचा. यातून अजय माधुरीला बेदम मारहाण करायचा. त्याच्या जाचाला कंटाळून ती माहेरी गेली होती.
पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अजय आपला मावसभाऊ पंकज मडावी याला सासुरवाडीला गेल्यानंतर दोन वेळा दाराला थाप मारूनही दार न उघडल्याने तिसऱ्यांदा दारावर थाप दिली. यावेळी अजयची पत्नी, सासरा व साळा या तिघांनी पहिल्यांदा पंकजच्या पायावर काठीने वार करून जखमी केले. तो तडफडत असताना अजयच्या डोक्यावर वार करून त्याला रक्ताच्या थारोड्यात पाडले.
त्यानंतर ते सर्व घरात घुसले. या प्रकरणात तिघांनी खून केला व माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. परंतु गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या माधुरीला तक्रारकर्ता बनवून तिच्या फक्त वडीलाला आरोपी केले, असे पंकजने सांगितले.
या प्रकणात गोरेगाव पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने तपास केला आहे. त्यांच्याकडील तपास काढून दुसऱ्या पोलिसांकडे तपास सोपवावा तसेच तिघांना आरोपी करावे. एवढेच नाही तर पंकजवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रपरिषदेत केली. (तालुका प्रतिनिधी)