...आणि 'त्या' बाप-लेकाची ती शेवटची मॉर्निंग वॉक ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:43 PM2021-11-14T12:43:34+5:302021-11-14T18:28:04+5:30

मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना तुमसरकडून तिरोड्याकडे लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून वडील व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.

Three members of the same family were hit by a vehicle | ...आणि 'त्या' बाप-लेकाची ती शेवटची मॉर्निंग वॉक ठरली

...आणि 'त्या' बाप-लेकाची ती शेवटची मॉर्निंग वॉक ठरली

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तिघांना वाहनाने चिरडले तिरोडा-तुमसर मार्गावरील घटनाभावाचा मृत्यू, वडील व बहीण जखमी

गोंदिया : तुमसरकडून तिरोड्याकडे लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनाने मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात मुलगा ठार झाला तर त्याची बहीण व वडील जखमी झाले. ही घटना येथील राधेलाल पटले यांच्या गणेश पेट्रोल पंपासमोर शनिवार (दि. १३) रोजी पहाट ५.३० च्या सुमारास घडली.

निखिल राजू उपरकर (३२, रा. साई कॉलनी, तिरोडा) असे मृतकाचे नाव आहे, तर जखमींमध्ये बहीण नेहा राजू उपरकर (२९) व वडील राजू हरिलाल उपरकर (६०, रा. साई कॉलनी) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार निखिल, नेहा व वडील राजू हरिलाल उपरकर हे तिन्ही बापलेक नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ५ वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घरून निघाले. ते बिर्सीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाने धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत पायी जाऊन घराकडे परत येत होते. दरम्यान, सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास राधेलाल पटले यांच्या पेट्रोल पंपासमोर तुमसरकडून तिरोड्याकडे येणाऱ्या चारचाकी वाहन अर्टिका, एमएच-४९/बीके- ९१२५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की, यात निखिल उपरकर १० फूट दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या डाव्या पायाचे पूर्ण हाड मोडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, तर नेहा उपरकर हिला चारचाकी घासत गेल्याने तिच्या उजव्या पायाला जखम झाली. तसेच अवघ्या तीन फुटांवर पुढे पुढे जात असलेले राजू उपरकर यांच्या कमरेला आणि गुडघ्याला मार लागला.

तिथून ते चारचाकी वाहन पुढे जात असताना वडील राजू उपरकर यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा क्षणभर मुलगा व मुलगी दिसले नाहीत. नंतर मुलगी खाली पडलेल्या अवस्थेत असताना मुलीला उचलले व निखिल कुठे आहे हे मुलीला विचारले. त्यावेळी समोर निखिल अंदाजे दहा फूट दूर अंतरावर पडून होता. त्यापाठोपाठ येत असलेल्या लग्नातील पाहुण्यांच्या गाडीला थांबवून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डाॅक्टरांनी निखिलची तपासणी करून मृत घोषित केले. जखमी वडील व बहिणीवर औषधोपचार करून सुटी देण्यात आली. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निखिलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. भाष्कर हरिलाल उपरकर (रा. भूतनाथ वॉर्ड, तिरोडा) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत.

Web Title: Three members of the same family were hit by a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.