गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळंतीणीवर योग्य उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत्यूच्या नातेवाईकांनी केला. यावरुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मंगळवारी (दि.१५) संताप व्यक्त केला. यासंबंधिचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर त्याची गांर्भियाने दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घाेरपडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यी चौकशी समिती बुधवारी (दि.१६) गठीत केली आहे.
या चौकशी समितीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अपूर्वा पावडे, डॉ. प्रसाद उपग्नलावर, डॉ. सुरेश सुंगध यांचा समावेश आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करुन २१ एप्रिलपर्यंत आपला अहवाल अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे सादर करणार आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात बाळंतीणीच्या कुटुंबीयांनी अद्याप लेखी तक्रार रुग्णालयाकडे केली नाही. लाेकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या आधारावर या प्रकरणाची दखल घेवून चौकशी समिती गठीत केल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.
काय होते प्रकरण
शहरातील आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली येथील रहिवासी प्रतिभा मुकेश उके (३०) हिला प्रसूतीसाठी येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ११ एप्रिलला दुपारी ४:३० वाजता दाखल करण्यात आले. १२ एप्रिलच्या पहाटे २:०७ वाजता सामान्य प्रसूतीतून तिने बाळाला जन्म दिला. परंतु प्रसूतीनंतर तिला अधिक रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु तिची प्रकृती गंभीर पाहून तिला १२ एप्रिलला सकाळी १० वाजता केटीएस रुग्णालयात येथे मुलासह रेफर करण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परिणामी तिचा १५ एप्रिलला सकाळी ११:३२ वाजता तिचा मृत्यू झाला होता.
बाळंतीणीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर केला होता आरोपबाई गंगाबाई महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी सामान्य प्रसूतीसाठी वाट पाहिली तिचे वेळीच सिझर केले नाही. परिणामी पोटावर ताण येऊन गर्भाशय फाटले व अधिक रक्तस्त्राव झाला. परिणामी तिला सहा बॉटल रक्त चढविण्यात आले. यामुळे बाळंतीणीच्या किडनी व हदयावर परिणाम होवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळंतीणीच्या नातेवाईकांनी केला होता.