लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : येथील रहिवासी बावनकर कुटुंबीयांच्या घरांना आग लागल्याने ३ घरे जळून राख झाली, तर एका घरातील आग वेळीच नियंत्रणात आणली. मंगळवारी (दि.२८) रात्री ८ वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेत बावनकर कुटुंबियांचे १३ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे. येथील दसाराम बावनकर, नीलाराम बावनकर, दुर्गा बावनकर व देवचंद बावनकर यांच्या घराला आग लागली होती. यामध्ये दसाराम, नीलाराम व दुर्गा बावनकर यांचे घर जळून राख झाले, तर देवचंद यांच्या घराची आग वेळीच नियंत्रणात आणल्याने त्यांचे कमी नुकसान झाले आहे. यासंदर्भात तलाठ्याने केलेल्या पंचनाम्यानुसार दसाराम बावनकर यांचे तीन लाख ६५ हजार रुपये, नीलाराम बावनकर यांचे सहा लाख २६ हजार रुपयांचे, दुर्गा बावनकर यांचे तीन लाख १७ हजार व देवचंद बावनकर यांचे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीत घरातील वाॅशिंग मशीन, फ्रीज, डायनिंग टेबल, तांदळाची पोती जळून राख झाली. रात्री अग्निशमन दलाने तब्बल ५ तास प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली, तर दसाराम बावनकर यांच्या घरातच आग लागली व तेथूनच अन्य सर्व घरांत पसरल्याची माहिती आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळावर पोहोचले होते. मंडळ अधिकारी पी.एन. वंजारी, तलाठी डी.बी. बोरकर यांनी पंचनामा केला. यावेळी दिनेश तुरकर, विष्णुदयाल जगने, उत्तम क्षीरसागर उपस्थित होते.