तीन घरे जळून लाखोंची हानी
By Admin | Updated: April 5, 2017 00:58 IST2017-04-05T00:58:08+5:302017-04-05T00:58:08+5:30
तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथे सोमवारी (दि.३) रात्री ७.२० वाजता विद्युत ....

तीन घरे जळून लाखोंची हानी
चांदलमेटा येथील प्रकार : पुराम यांची दिला धीर, मदत मिळवून देण्याचे आश्वासन
देवरी : तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथे सोमवारी (दि.३) रात्री ७.२० वाजता विद्युत मिटरच्या वायरींगमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तीन परिवारांच्या घराला आग लागून संपूर्णत: तिन्ही घरांची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, देवरी ते आमगाव रोडवरील डोंगरगावच्या बाजूला असलेल्या आणि ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथील केशवराव वल्के, जियालाल वल्के आणि बाबुलाल वल्के या तिन्ही भावांचे संयुक्त चाळीसारखे मातीचे घर आहे. यात तिन्ही मिळून संयुक्त पध्दतीने एकच विद्युत मिटर होता. घटनेच्या वेळी म्हणजे सोमवार (दि.३)च्या सायंकाळी ७.२० वाजता उन्हाळ्याच्या गरमीमुळे सर्व जण बाहेरील अंगणात बसले होते. त्याच वेळेस शार्टसर्कीटमुळे अचानक मिटरला जोडलेल्या वायरींगला आग लागली. ही आग काही परिवारातील इतर घरांना लागली. या अग्नीतांडवात पुरुष आणि महिलांच्या अंगावर असलेले कपडे तेवढे शिल्लक राहीले, मात्र घरातील कपडे, दागिने, रोख राशी, कागदपत्रे, शालेय दप्तर, पुस्तक आणि अन्न धान्य असे सर्वच जळून खाक झाले. एका भावाकडील तर सेवानिवृत्तीचे आणि लग्नासाठी जुळवलेले दोन लाख रुपये जळाल्याची चर्चा आहे.
सरपंच कमल येरणे यांना माहित होताच आपल्या मित्रांसह रात्रीच दहा वाजेपासून परिस्थितीवर नजर ठेवून होते. मंगळवारला आ.संजय पुराम यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्पुरती पाच हजारांची मदत केली. तसेच शासनाकडून योग्य ती जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गावकरी मंडळीकडून सुध्दा पुढील एक आठवड्याची भोजन सामुग्री जमा करून निवासाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाकडून नायब तहसीलदार बारसे आणि मंडळ अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यात सर्व मिळून २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)